सोलापूर : लोकसभेचे पडघम वाजत असताना सध्या विविध एक्झिट पोलमुळे निकालाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत . एनडीए की इंडिया आघाडी, यात नेमकी सत्ता कोणाची येणार यावर पैजा लागायलाही सुरुवात झाल्या आहेत. यात आता माढा येथील कापड व्यावसायिक विशाल शहा यांनी बरोबर 20 एप्रिल रोजी आपला अंदाज फेसबुकवर जाहीर केला आहे. भाजपच्या एनडीए आघाडीला देशात 389 जागा मिळतील आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. विशाल शहा यांनी गेल्या वेळच्या निवडणुकीत व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला होता.
गेल्यावेळचा अंदाज तंतोतंत खरा ठरला
विशाल शहा हे नाव सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत निकालापूर्वी दोन महिने आधी, म्हणजे 20 एप्रिल 2019 रोजी फेसबुकवर अंदाज व्यक्त करताना त्यांनी भाजपला 307 आणि एनडीए आघाडीला 350 जागांचा अंदाज वर्तवला होता. यानंतर निकालाच्यावेळी सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकले असताना विशाल शहा यांचा अंदाज 99.24 टक्के इतका तंतोतंत ठरला होता.
लोकसभेचा अंदाज बरोबर आल्यानंतर विशाल शहा खऱ्या अर्थाने सोशल मीडियात चर्चेत आले होते. यानंतरही त्यांनी वर्तवलेले अनेक भाकिते तंतोतंत जुळल्याने यावेळी ते काय अंदाज देतात याकडे सगळ्या सोशल मीडियाचे लक्ष होते.
भाजप 334 तर एनडीए 398 जागा मिळवणार
शनिवारी म्हणजे 20 एप्रिल 2024 रोजी फेसबुकवर भाकीत वर्तवताना विशाल शहा यांनी भाजपाला 334 जागा तर सहयोगी पक्षाला 55 जागा मिळतील असं सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असंही त्यांनी सांगितलं. भाजप 400 पारच नारा देत असलं तरी त्यांना एकूण किमान 389 जागा मिळतील असे भाकीत वर्तवले आहे.
माढा आणि बारामती भाजप जिंकणार
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घासून लढती होणार असल्याचा अंदाज विशाल शाह यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप जिंकेल तर बारामती आणि सातारा या दोन्ही ठिकाणी सुनेत्रा पवार आणि उदयनराजे यांचा विजय होणार असल्याचेही भाकीत शहा यांनी वर्तवले आहे.
माढा लोकसभेत घासून निवडणूक होत असल्याचं चित्र असलं तरी रणजित निंबाळकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांचा पराभव करतील असा दावा त्यांनी केला आहे. सोलापूरमध्येही राम सातपुते जिंकणार असून ते प्रणिती शिंदे यांचा पराभव करतील असे भाकीत वर्तवले आहे.
विशाल शहा हे सध्या 68 वर्षांचे असून माढा शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी आहेत. त्यांचा काही वर्षांपासून सिक्स सेन्स जागृत झाल्याने त्यांनी वर्तवलेले भाकीत खरी ठरत आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी फेसबुकवर वर्तवलेल्या भाकितानंतर आता चर्चेला नवीन तोंड फुटले आहे. गेल्या निवडणुकीत ज्याप्रमाणे माझे भाकीत 99 टक्के पेक्षा जास्त खरे झाले तसेच यंदाही झालेले दिसेल असा त्यांचा दावा आहे.
ही बातमी वाचा: