परभणी/बीड : लोकसभा निवडणुकांच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे, कार्यकर्त्यांसह उमेदवार आणि मतदारांची उत्कंठा वाढली आहे. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर (Loksabha) गुलाल कोण उधळणार, विजयाचा जल्लोष कोण करणार, यावर तर्क वितर्क लावले जात, आणि अंदाज लढवले जात आहेत. मात्र, निवडणुक निकालानंतर विजयचा जल्लोष करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय रंग पाहायला मिळाल्यामुळे चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघा विजयाचा जल्लोष करताना काळजी घ्यावी लागणार आहे. बीड (Beed) आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना जंगी मिरवणूक काढता येणार नाही. बीड आणि परभणी (Parbhani) पोलिसांनी विजयी मिरवणुकीवर निर्बंध आणले आहेत.
बीडनंतर आता परभणीतही विजयी उमेदवारांना अथवा कार्यकर्त्यांना मिरवणूक काढता येणार नाही. तसेच, सोशल माध्यमांवरही आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. परभणीतील सर्वच उमेदवारांना पोलिसांनी तशा लेखी सूचनाही दिल्या आहेत. तसेच, विविध ग्रुपच्या व्हॉट्सअप अॅडमिन्सन ग्रुप अॅडमिन ओन्ली करण्याचेही निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
देशातील लोकसभा निवडणुकांच्या निकालात परभणी लोकसभेसाठीची मतमोजणी उद्या होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढता येणार नाहीत, अशा लेखी सूचना परभणी पोलिसांनी सर्वच 34 उमेदवारांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे सोशल माध्यमांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. सोशल माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरही तशाप्रकारच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.परभणी पोलिसांनी मार्गदर्शन सूचना जारी केल्या असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
मिरवणुकीसाठी परवानगी गरजेची
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी अनोखी कार्यपद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरची देखरेख वाढवली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप अॅडमीनवर बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. बीडमध्ये यंदाच्या निवडणुकीत जातीय तेढ पाहायला मिळाला. त्यातच, मुंडेवाडी गावातील एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियातूनही जातीय मतभेदाला खतपाणी घालण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच, लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर व्हाट्सअॅप ग्रुपवर जर आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली, तर ग्रुप ॲडमिनवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, विजयी उमेदवारासाठी मिरवणूक काढायची असल्यास परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. कोणालाही विनापरवानगी मिरवणूक काढता येणार नाही, असेही बीड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बीड पोलिसांचा रूट मार्च
बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस यंत्रणा आता अलर्ट मोडवर पाहायला मिळत आहे. बीड शहरात पोलीस दलाच्या वतीने भव्य असा रूट मार्च काढण्यात आला. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर बाहेरील आणलेला बंदोबस्त आणि पोलीस व्हॅन देखील आज बीड शहरातील रस्त्यावर रूट मार्चमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर व्यक्त होताना जबाबदारी पूर्वक व्यक्त व्हावं, जर कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आवाहन आणि इशारा देत हा रूट मार्च काढण्यात आला.