नवी दिल्ली : अब की बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा (Loksabha) निवडणुकी स्वबळावर बहुमताचाही आकडा गाठता आला नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर रात्री 10.30 वाजेपर्यंत निकालाची अपडेट माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये, भाजपने 213 जागांवर विजय मिळवला असून 27 जागांवर भाजप (BJP) उमेदवार आघाडीवर आहेत. म्हणजेच, लोकसभा निवडणुकीत भाजपचे 240 जागांपर्यंत स्वबळावर उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे, बहुमताचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच मोदींना सरकार स्थापन करावं लागणार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला अपेक्षित जागा मिळाल्यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांनी समाधान व्यक्त केलं आहे. काँग्रसने 83 जागांवर विजय मिळवला असून 16 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीत जनमताचा कौल पाहता यंदा बहुमताचा आकडा पार करता येईल, एवढ्या जागा कुठल्याही पक्षाला जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे, मित्र पक्षांसोबतच्या आघाडीवरच भाजपला सत्ता स्थापन करता येईल.उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने 35 जागांवर विजय मिळवला असून 2 जागांवर आघाडी आहे. म्हणजेच, 37 जागांवर समाजवादी पक्षाला विजय मिळत आहे.चौथ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बढत घेतली आहे. तृणमूलला 27 जांगावर विजय मिळाला असून 2 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर, तामिळनाडूतील डीएमके पक्षाला 13 जागा जिंकता आल्या असून 9 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे, त्यांना 22 जागा जिंकता येतील, असा अंदाज आहे.
भाजपच्या 63 जागा घटल्या
देशातील भाजप प्रणित आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. एनडीएने 293 जागांवर आघाडी घेतली असून इंडिया आघाडी 232 जागांसह आघाडीवर आहे. एनडीएने तिसऱ्यांदा बहुमताचा आकडा गाठल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनतेचे आभार मानले. तसेच, मित्र पक्षांसह सत्तास्थापनेचा दावाही केला आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत देशातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल. मात्र, गत 2019 मध्ये 303 जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत देशात जवळपास 240 जागांवरच विजय मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे, गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जवळपास 60 ते 63 जागा घटल्या आहेत.
महत्त्वाच्या राज्यात काय स्थिती
उत्तर प्रदेशात एनडीए आघाडीला 36 जागांवर आघाडी असून इंडिया आघाडीला 43 जागांवर आघाडी आहे. त्यानंतर, महाराष्ट्रात 29 जागांवर इंडिया आघाडीला आघाडी असून भाजप एनडीएला 18 जागांवर आघाडी आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 29 जागा आहेत, तर भाजपला केवळ 12 जागांवर आघाडी आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या येथे 6 जागा घटल्याचे दिसून येते. बिहारमध्ये एनडीएला 30 जागांवर आघाडी असून इंडिया आघाडीला 9 जागांवर आघाडी आहे. तामिळनाडूत डीएमकेने 39 जागांवर आघाडी घेतली असून भाजपला एकही जागा तामिळनाडूत जिंकता आली नाही. कर्नाटकमध्ये इंडिया आघाडीला 19 जागा असून इंडिया आघाडीला 9 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, मध्य प्रदेशच्या सर्वच 29 जागा जिंकण्यात भाजपला यश मिळालं आहे. राजस्थानमध्येही भाजपला मोठा फटका बसला असून 14 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, इंडिया आघाडीला येथून 11 जागांवर आघाडी आहे. राजधानी दिल्लीत भाजपाने 7 ही जागांवर विजय मिळवला आहे.
महाराष्ट्रात महायुतीला फटका
महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला असून 45 जागांवर विजयाचा दाव करणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, महाविकास आघाडीला 31 जागांवर आघाडी मिळाल्याने महाविकास आघाडीचे नेते आनंदीत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या तीन केंद्रीयमंत्र्यांना पराभवाचा धक्का जनतेनं दिला आहे. तर, बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून महादेव जानकर यांचाही पराभव झाल्याचा निकाल यंदा पाहायला मिळाला.