मुंबई: अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातून लोकसभेचा (Lok Sabha Result 2024) निकाल समोर आला. अत्यंत उत्साहवर्धक अशा या निकालात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं. मागच्या काही वर्षांपासून राजकारणाची समीकरणं बदलताना आणि राज्यकर्त्यांच्या भूमिका बदलताना महाराष्ट्राने पाहिल्या. त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राच्या जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीत दिल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांचं बंड त्यानंतर अजित पवारांचं बंड या सगळ्यानंतर ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली होती. दरम्यान या सगळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


अजित पवारांनी यंदाच्या लोकसभेत एकूण चार जागा महायुतीकडून लढवल्या होत्या. त्यामध्ये बारामती ही अत्यंत अस्मितेचा मतदारसंघ अजित पवारांच्या वाटेला गेली होती. पण या जागेवरही अजित पवारांच्या हाती निराशाच पडली. पण आता अजित पवारांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी तयारी लागण्याचं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रायगडचे विजयी उमेदवार सुनील तटकरे यांचं अभिनंदन केलं आहे. 


अजित पवारांनी काय म्हटलं?


लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. 






विधानसभेच्या कामाला लागण्याचं आवाहन


राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.


सुनील तटकरेंचं अभिनंदन


अजित पवारांनी सुनील तटकरे यांचं कौतुक करत म्हटलं की, सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे. प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन!


ही बातमी वाचा : 


Lok sabha Election Result 2024: अस्तित्त्वाच्या लढाईत निकराने लढा दिला अन् कमाल झाली, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 17 उमेदवारांचा निकाल काय लागला?