सोलापूरच्या जागेवर लवकरच मोठा ट्विस्ट, महत्त्वाचा उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेणार!
सोलापूरमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. येथे वंचित बहुजन आघाडीचे (VBA) उमेदवार राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा (22 एप्रिल) शेवटचा दिवस आहे. वंचित बहुजन आघाडीचे ते अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता सोलापुरातील (Solapur) निवडणुकीचे गणित बदलणार आहे.
राहुल गायकवाड अर्ज मागे घेताना काय म्हणाले?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर गायकवाड यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मला युद्धाच्या मैदानात उतरवण्यात आलं. बंदुकही देण्यात आली. पण त्या बंदुकीत गोळ्याच नाहीत, अशी खदखद गायकवाड यांनी व्यक्त केली. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेल्या पंधरा दिवसांपासून मी सोलापूर जिल्ह्यात आलो. इथे आल्यानंतर माझी सोलापूरच्या कार्यकारिणीशी भेट झाली. सोलापूरच्या जनतेलाही मी भेटलो. आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. मी गेल्या पंधरा दिवसांत खूप काही अनुभवले आहे. या पंधरा दिवसांत मी जे अनुभवले ती चळवळ नाही. सोलापुरातील भोळीभाबडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे.जनतेला आंबेडकरांबद्दल आदर आहे. पण पंधरा दिवसांच्या कालावधीत मला समजलं की, चळवलीसाठीची फळी पोकळ आहे. ही फळी पोषक नाही, अशा भावना राहुल गायकवाड यांनी व्यक्त केल्या.
मला बंदुक दिली पण त्यात गोळ्या नाहीत
सोलापुरातील कार्यकारिणीचा स्वार्थ आजही तेवढाच घट्ट आहे. तिथे मला बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाहीत. मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होतो. पण माझ्यासाठी लढणारी ही फळी पाहून मला असं वाटतंय की, मला मैदानात सोडलंय. माझ्या हातात बंदुक दिली आहे. पण त्या बंदुकीत गोळ्या नाहीत. त्या बंदुकीत छरे आहेत. या छऱ्यांच्या मदतीने मी युद्ध लढवेन पण ते मी जिंकू शकणार नाही, असंही राहुल गायकवाड यांनी सांगितलं.
भाजपला मदत होऊ नये म्हणून निर्णय
मी जर अर्धवट लढलो तर भाजपच्या कार्यकर्त्याला मदत करतोय, असं वाटतंय. भाजपच्या उमेदवाराला सोईचं वातावरण निर्माण होईल का, अशी मला भीती वाटत आहे. भाजपचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल. संविधानाला धोका निर्माण होईल, असं माझ्याकडून काही होऊ नये असे मला वाटतं, असं थेट स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी दिलं.
प्रणिती शिंदे यांना होणार फायदा
दरम्यान, गायकवाड यांच्या या निर्णयामुळे सोलापूर मतदारसंघाच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. 2019 सालच्या निवडणुकीत या जागेवर वंचितच्या तिकिटावर प्रकाश आबंंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आंबेडकरांना एक लाख 70 हजार मते मिळाली होती. याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. यावेळीदेखील वंचितने येथून राहुल गायकवाड यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता होती. मात्र आता गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळे प्रणिती शिंदे यांना त्याचा फायदा होणार आहे.