मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून केवळ 8 लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित 40 जागा कोणी लढवायच्या याबाबत मविआच्या (Mahaviaks Aghadi) नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. यामध्ये लोकसभेच्या (Loksabha Election 2024) 18 जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. यापैकी चार लोकसभा मतदारसंघ हे मुंबईतील असल्याचे सांगितले जाते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गेल्यावर्षी मातोश्रीवर झालेल्या आढावा बैठकीत मुंबईतील सहापैकी चार जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना आदेश दिले होते. 


ठाकरे गटाने भाजपसोबत युतीत असताना मुंबईत केवळ 3 उमेदवारच उभे केले होते. परंतु, आता यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गट मुंबईतील आणखी एका जागेवर उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे निवासस्थान असलेला ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आतापर्यंत कायम भाजपच्या वाट्याला आला होता. परंतु, यंदा ठाकरे गट या मतदारसंघातून आपला उमेदवार रिंगणात उतरेल. याच मतदारसंघात म्हणजे भांडूपमध्ये ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांचेही निवासस्थान आहे. मनोज कोटक हे सध्या या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईत चुरशीची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


ठाकरे गट मुंबईतील कोणत्या 4 मतदारसंघात उमेदवार उभे करणार?


सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले जातील. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची नियुक्ती केली होती. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी सुधीर साळवी, सत्यवान उभे, दक्षिण मध्य मुंबईसाठी रवींद्र मिर्लेकर, वायव्य मुंबईसाठी विलास पोतनीस तर ईशान्य मुंबईत दत्ता दळवी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


ठाकरे गटाचे चार उमेदवार कोण?


दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार मतदारसंघांमध्ये ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. यापैकी दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी मिळू शकते. तर दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले अनिल देसाई लोकसभेच्या रिंगणात उतरतील. यापूर्वी ते राज्यसभेचे खासदार होते. तर वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर हे शिंदे गटात गेलेले त्यांचे वडील गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात निवडणूक लढवतील. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात. संजय दिना पाटील यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते.


आणखी वाचा


महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपला ३२, शिवसेना १२ तर अजितदादा गटाला अवघ्या ४ जागा