मुंबई : मिशन लोकसभा डोळ्यासमोर ठाकरे गट निवडणुकीच्या कामाला लागले आहे. अशात स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे दौरे करून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, आज आणि उद्या असे दोन दिवस उद्धव ठाकरे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या (Buldhana Lok Sabha Constituency) दौऱ्यावर असणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यानंतर ते लगचेच 24 फेब्रुवारी रोजी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा (Hingoli Lok Sabha Constituency) दौर करणार होते. मात्र, त्यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवस बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आज आणि उद्या या दोन दिवसांत ठाकरेंच्या एकूण सहा सभा होणार आहेत. यामध्ये आज चिखली, मोताळा, जळगाव जामोद या ठिकाणी तीन सभा होतील. तर उद्या खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा या तीन ठिकाणी सभा होणार आहेत. त्यामुळे या सभांमधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
असा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा...
22 फेब्रुवारी 2024
- चिखली : 02.00 वाजता सभा होणार आहे.
- मातोळा : 04.30 वाजता सभा होणार आहे.
- जळगाव जामोद : 06.30 वाजता सभा होणार आहे.
23 फेब्रुवारी 2024
- खामगाव : 11.00 वाजता कार्यकर्त्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधतील.
- मेहकर : 02.00 वाजता सभा होणार आहे.
- सेनगाव : 04.15 वाजता सभा होणार आहे.
- कळमनुरी : 06.15 वाजता सभा होणार आहे.
उद्धव ठाकरे स्वतः मैदानात...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात ठाकरे गटाकडून देखील लोकसभेची तयारी केली जात आहे. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे यंदा उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक एवढी सोपी नसणार आहे. त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून ठाकरे हे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून पक्षाचा आढावा घेत आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन पुन्हा शिवसैनिकांना जोडण्याचे काम करत आहेत.
हिंगोलीचा दौरा रद्द...
बुलढाणा जिल्ह्याचा दौर केल्यावर उद्धव ठाकरे 24 फेब्रुवारीला हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा देखील दौरा करणार होते. याबाबत तयारी देखील झाली होती. मात्र, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला असल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :