छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण द्या, त्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे हे काय दादा झाले आहेत का?, असा सवाल त्यांनी विचारला. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


या पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला. नैराश्यात असलेल्या मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत. त्यांनी असे करु नये, असे सदावर्ते यांनी म्हटले. मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या नादाला लागू नये. यापूर्वीही मनोज जरांगे यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करुन मुंबईत येऊन धुडगूस घालू, असे म्हटले होते. ते मुंबईला वेठीस धरु पाहत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात बोलणारा मीच होतो. कायद्याचे उल्लंघन करुन अशाप्रकारे वेशीत घुसता येत नाही, हे मी दाखवून दिले आहे. मनोज जरांगे मुंबईकडे येत असताना १४९ ची नोटीस निघाली होती. मी दाखल केलेल्या याचिकनंतरच ती नोटीस जारी करण्यात आली होती, गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंची खिल्लीही उडवली. राज्यपालांची सही नाही तर आरक्षण नाही आणि सलाईन नाही लागली तर उपोषण नाही, अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरागेंना लक्ष्य केले.


आंतरवाली सराटीत दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या: सदावर्ते


मनोज जरांगे पाटील हे नैराश्यात आहेत. अंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या, अशी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी करत जरांगेंवर हल्लाबोल केला. मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी, त्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. आता राज्य सरकारने स्वतंत्र दिलेलं 10 टक्के आरक्षण, केंद्राने दिलेले EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षण यामधील लाभातील फरक ओळखा. जे पदरचं आहे ते सोडून द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षणाबद्दल विचारतात त्याचा लाभ घेता, त्यावेळेस तुम्हाला इतर कोणतही दुसरं आरक्षण घेता येत नसल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. त्यामुळे मराठ्यांनी आरक्षणाच्या मागे लागू नये, असेही सदावर्ते म्हणाले.


मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते पुन्हा हायकोर्टात


राज्य विधिमंडळाने मंगळवारी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले होते. त्याविरोधात गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.  हे संविधान सहमत कृत्य नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Sunil Shukre) हे मराठा चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अहवालाला महत्त्व देऊ नये. राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला तर आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले होते.


आणखी वाचा


गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात, मराठा आरक्षणविरोधात पुन्हा हायकोर्टात, यावेळी कारण काय?