मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते नसीम खान गेल्या अनेक दिवासंपापासून नाराज होते. त्यांच्या या नाराजीनंतर काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता त्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत असून, यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नसीम खान यांची नाराजी आता दूर झाली आहे. आमीह बहुसंख्य आणि अल्पसंख्याक यांना सोबत घेऊनच पुढे जात आहोत, असे चेन्नीथला म्हणाले. त्यांनी इतर अनेक मुद्यांवर यावेळी भाष्य केले.
नसीम खान यांची नाराजी आता दूर-चेन्नीथला
नसीम खान यांची नाराजी आता दूर झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढवणे सोपे होणार आहे. नसीम खान आता वर्षा गायकवाड यांचा प्रचार करणार आहेत. यावर बोलताना चेन्नीथला म्हणाले की, लोकांची भावना ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत आहे. आम्ही अल्पसंख्याक तसेच बहुसंख्याकांना सोबत घेऊनच पुढे जात आहोत. नसीम खान यांची नाराजी आता दूर झाली आहे.
वडेट्टीवार यांनी केलेले विधान ही काँग्रेसची भूमिका नाही
काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले होते. शहीद हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्यात चांगलाच वाद झाला होता. दरम्यान यावरही चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी एका पुस्तकाचा आधार हे विधान केले आहे. ती काँग्रेसची भूमिका नाही. १० वर्षांआधी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी हे पुस्तक लिहिले होते. पुस्तकाला कोट करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचेच सरकार होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विसासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, असे चेन्नीथाला म्हणाले.
कार्यकर्त्यांनी राजीनामे मागे घ्यावे, नसीम खान यांचे आवाहन
दरम्यान, नाराजी दूर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी प्रचारसमितीचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. काँग्रेसने माझ्या मागण्याची दखल घेतली आहे. त्यामुळे मी हा राजीनामा मागे घेतोय, असे नसीम खान म्हणाले आहेत. माझ्या इतर कार्यकर्त्यांनीही आपले राजीनामे मागे घ्यावेत, असे आवाहन नसीम खान यांनी केले आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढाई सोपी जाणार आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींच्या भेटीनंतर नसीम खान यांची नाराजी दूर