कोल्हापूर: मुंबईवरील 2611 हल्ल्याच्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण होताच विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, हे माझे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या आधारे केले होते. त्यामध्ये तसा उल्लेख होता. ती गोष्ट खरी असेल तर हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असे मी म्हटल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ते रविवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर टीकास्त्र सोडले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तेव्हा निकम यांना म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याचे गरज नाही. तालुका लेव्हलच्या बेलआऊट करणाऱ्या वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही कसाबला फाशी झाली असती. कारण कसाब हा दहशतवादी होता. त्यामुळे त्याला फाशी झालीच असती. त्यामुळे यामध्ये उज्ज्वल निकम यांनी डिंग मारण्याचे किंवा बडेजाव मिरवण्याचे कारण नाही, असे विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखलं होतं, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. आम्ही जे काय बोललो आहोत, त्याविषयी उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की आहे, असेही वडेट्वीवार यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर मात्र भाजप देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते.
चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपालाविरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
आणखी वाचा
उज्ज्वल निकम यांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं, मुश्रीफ यांचा संदर्भ, किरण मानेंची नवी पोस्ट