दिल्ली : माहायुतीच्या (Mahayuti) जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. भाजपाच्या (BJP) निवडणूक समितीची बैठक लवकर संपली तर केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्यूल्यावर चर्चा होणार आहे. 


...तर बैठक आजच होणार 


या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्यूल्यावर चर्चा होणार आहे. भाजपाच्या निवडणूक समितीची बैठक संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. ही बैठक लवकर संपली तर आजच महायुतीच्या घटकपक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याशी बैठक होईल. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा केली करून जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.


80 टक्के काम पूर्ण 


देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार जागावाटपाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झालेले आहे. 20 टक्के काम बाकी आहे, त्यावर चर्चा चालू आहे. भाजपला मिळणाऱ्या जागा तसेच अपेक्षित असलेल्या जागा यांची माहिती देवेंद्र फडणवीस भाजापच्या केंद्रीय निवडणूक समितीपुढे ठेवणार आहेत.


कोणाला किती जागा?


भाजपनए महाराष्ट्रात आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही नाव आहे. भाजपने आपल्या काही उमेदवारांची नावे जाहीर केलेली असली तरी महायुतीच्या संपूर्ण उमेदवारांची यादी अद्याप बाकी आहे. मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाजपाला 20, शिदे यांच्या शिवसेनेला 13, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 6 तर मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.


अनेकवेळा दिल्लीवारी, मात्र तोडगा नाही


गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीवर जागावाटपावर तोडगा निघत नाहीये. काही जागांवरील वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी अनेकवेळी दिल्लीवारी केली. मात्र तरीदेखील महायुती अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकलेली नाही. सातारा, माढा, रामटेक, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर यासह इतर मतदारसंघांवरील वाद कायम आहे. त्यामुळेच आता काही तासांनी होणाऱ्या बैठकीत या जागांवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.


महाविकास आघाडीचाही अशीच स्थिती


दरम्यान, विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीचीही अशीच स्थिती आहे. मविआत काही जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांनी दावा सांगितलेला आहे. त्यामुळे मविआतही अशा जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचाही मविआत अधिकृतपणे समावेश झालेला नाही. त्यामुळे मविआ यावर काय तोडगा काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :


Devendra Fadnavis : तर उदयनराजेंना महाविकास आघाडी बिनविरोध करणार का? शाहू महाराजांबद्दल विचारताच देवेंद्र फडणवीसांचा सवाल!


Kedar Dighe : कल्याणमधून केदार दिघे दंड थोपटणार, उद्धव ठाकरेंच्या डावावर श्रीकांत शिंदेंचं थेट उत्तर; कोण बाजी मारणार?