अहमदनगर : महायुतीमध्ये जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. युतीतील तिन्ही घटकपक्षांत काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. काही जागांवर मात्र भाजपने (BJP) आपले उमेदवार जाहीर केले असून ठाकरेंची शिवसेना (Shivsena), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीनेही (NCP) आपले काही उमेदवार ठरवलेले आहेत. यात ठाण्याच्या जागेचाही समावेश आहे. महायुती ठाण्यातून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तिकीट देणार आहे. दुसरीकडे शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांच्याकडून केदार दिघे (Kedar Dighe) यांना तिकीट दिले जाणार आहे. दिघेंच्या याच संभाव्य उमेदवारीवर श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 


शिर्डीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार


श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया दिली. महायुतीची जागा वाटप लवकरच होईल आणि उमेदवारदेखील लवकरात लवकर जाहीर केले जातील, असे शिंदे म्हणाले. शिर्डी लोकसभा सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. येथे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. मात्र या जागेवर भाजपाकडूनही दावा सांगितला जातोय. यावर बोलताना कोण कुठून निवडणूक लढवणार हे येत्या दोन दिवसांत कळेल. शिर्डीमध्ये सध्या आमचा खासदार आहे. त्यामुळे आम्हीच या जागेवर निवडणूक लढवणार, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. 


मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार


मनोज जरांगे यांच्या रुपात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. या निवडणुकीत मराठा समाजाकडून प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहेत. मराठा समाजाची मतं ही निर्णायक ठरणार आहेत. यावरही श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या-ज्या सूचना केल्या होत्या, त्यावर आमचं सरकार सकारात्मक होतं. त्यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर आम्ही निर्णय घेतला आहे. महायुतीचे हे पहिलेच सरकार आहे ज्याने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या. येणाऱ्या काळातदेखील मराठा समाजाच्या काही मागण्या असतील तर त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.


केदार दिघेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया


कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांनी लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदेंना थोपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. यामध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाचा समावेश आहे. श्रीकांत शिंदेंचे वडील तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना गुरुस्थानी मानतात. असे असताना आनंद दिघेंच्या पुतण्यालाच उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना चेकमेट करू पाहतायत. यावरही श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. कोणी कोठूनही उभे राहू शकतं. मी गेल्या पाच वर्षांत जनतेचं जे काम केलेलं आहे, त्यावर विश्वास ठेवून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कल्याणच्या जनतेने गेल्या पाच वर्षांत माझं काम पाहिलेलं आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात माझा मोठ्या फरकाने विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.