नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचं (18th Lok Sabha First Session )पहिलं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून बर्तृहरी महताब (Bhartruhari Mahtab) यांची निवड केली होती. हंगामी लोकसभा अध्यक्षांनी कामकाजाला सुरुवात करताना राष्ट्रपतींनी हंगामी लोकसभा अध्यक्षांना सहकार्य करण्यासाठी हंगामी तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्यासाठी पाच खासदारांची शिफारस केल्याची महिती दिली. यामध्ये सत्ताधारी पक्षातील दोन खासदार तर विरोधी पक्षातील तीन खासदारांचा समावेश होता. यामध्ये काँग्रेसचे खासदार के. सुरेश, द्रमुकचे टीआर. बालू आणि टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, भाजपचे खासदार राधामोहन सिंग आणि फगनसिंग कुलस्ते यांच्या नावाचा समावेश असल्याचं बर्तृहरी महताब यांनी सांगितलं. मात्र, के. सुरेश, टीआर. बालू आणि सुदीप बंदोपाध्याय शपथ घेतली नाही.
बर्तृहरी महताब यांनी सांगितल्याप्रमाणं सभागृहाचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. हंगामी अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसच्या के. सुरेश आणि द्रमुकच्या टीआर बालू यांच्या नावाची घोषणा केली मात्र या दोन्ही खासदारांनी शपथ घेतली नाही. यानंतर माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांनी शपथ घेतली. यानंतर भाजपच्या फगनसिंह कुलस्ते यांनी शपथ घेतली. लोकसभेतील अधिकाऱ्यांनी यानंतर टीएमसीच्या सुदीप बंदोपाध्याय यांच्या नावाची घोषण केली. मात्र, सुदीप बंदोपाध्याय यांनी शपथ घेतली नाही.
संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा एल्गार
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या तीनही सदस्यांनी प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलवर बहिष्कार टाकला. यामध्ये काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर. बालू यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले होते. मात्र, तिघांनी देखील शपथ न घेतल्यानं आताप्रोटेम स्पीकरच्या पॅनेलचे हे तीन सदस्य बर्तृहरी महताब यांना सहकार्य करणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.
विरोधी पक्ष आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली. त्यावेळी विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षाच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांना संविधानाच्या प्रती दाखवल्या. विरोधी पक्षांनी संसदेबाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून संविधान हातात घेत एकजूट दाखवत आंदोलन केलं. विरोधी पक्षाचे खासदार संविधानाची प्रत हातात घेत लोकसभेत दाखल झाले.
दरम्यान, हंगामी अध्यक्ष बर्तृहरी महताब यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सभागृहाला दिली. राहुल गांधी यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा स्वीकारत असल्याचं म्हटलं. राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. नियमाप्रमाणं त्यांना 18 जूनपर्यंत एका लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा द्यायचा होता. त्यानुसार त्यांनी वायनाडची खासदारकी 17 जूनला सोडली.
संबंधित बातम्या :