मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधील (Mahayuti) अनेक आमदार मंत्रि‍पदाच्या बोहल्यावर चढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी रात्री फार मोजक्या लोकांसह दिल्लीत गेले होते. दिल्लीत ते कोणाला भेटले, कोणाशी चर्चा केली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, काहीवेळ दिल्लीत थांबल्यानंतर एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी कोणालाही फारसा थांगपत्ता लागू न देता दिल्ली आणि नागपूरची वारी केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, भाजपचे नवीन प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मंत्री आश्विनी वैष्णव प्रभारी मुंबईत येऊन विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेतील. भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल.


मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी?


एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित दिल्लीवारीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची भेट झाल्याची शक्यता आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप याबाबत, चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीमुळे राज्यात लवकरच मोठ्या राजकीय हालचाली घडण्याचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडाऱ्यात 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होत आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून या सभेचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या स्वागताचे भंडारा शहरामध्ये ठिकठिकाणी मोठे मोठे बॅनर आणि होर्डिंग लावण्यात आलेली आहे. 


आणखी वाचा


 राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार? खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांना डच्चू, भाजप तरुण चेहऱ्यांना संधी देणार