Lok Sabha Elections 2024: नवी दिल्ली : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Lok Sabha Election 2024) टप्प्यांतील मतदान प्रक्रिया (Voting Process) कधीच संपली असून आता सर्वांच्या नजरा 4 जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. आता विजय-पराभवासोबतच कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान? याचेही अंदाज बांधले जात आहेत. एका हिदीं वृत्तवाहिनीशी बोलताना राजकीय विश्लेषक आणि स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी त्यांच्या अनुभवावरून अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, यावेळी महाराष्ट्रात एनडीएला 20 जागांचं नुकसान सहन करावं लागू शकतं. 


राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता, मला असं वाटतं की, इथे एनडीएच्या हातून 20 जागा जाण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील निवडणूक खरी शिवसेना कोणती याबद्दल होती? मुंबईतल्या निवडणुकीत तर स्पष्टच झालं की, खरी शिवसेना कोणती. खरी राष्ट्रवादी कोणती? याबाबत शरद पवारांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं."


NDA महाराष्ट्रात 20 जागा गमावेल : योगेंद्र यादव


योगेंद्र यादव पुढे बोलताना म्हणाले की, "गेल्या वेळी महाराष्ट्रात एनडीएला एकूण 42 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी मला 22 पेक्षा जास्त जागा दिसत नाहीत. जे 20 जागांचं नुकसान आहे, त्यात भाजपचं नुकसान फक्त 5 जागांचं आहे. 15 जागांचं नुकसान इतर आघाडीच्या साथीदारांचं आहे. माझा स्वतःचा समज आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अवस्था निवडणुकीनंतर वाईट होईल. या निवडणुकीत त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो."


महाराष्ट्रात भाजपला किती जागा? 


योगेंद्र यादव पुढे बोलताना म्हणाले की, "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा लढवल्या आहेत. त्यामुळे भाजपला जास्त जागांचं नुकसान होणार नाही. त्यामुळे भाजपला 4-5 जागांचं नुकसान सोसावं लागणार आहे." दरम्यान, महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांसाठी 5 टप्प्यात मतदान झालं आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.


यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी फार वेगळी आहे. महाराष्ट्रात दोन आघाड्या आहेत. महायुती आणि इंडिया आघाडी अंतर्गत महाविकास आघाडी (MVA). महायुतीत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना (UBT) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्रातील निवडणूक निकालांकडे संपूर्ण देशाचंच लक्ष लागलेलं आहे.