ठाणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्यावतीने भाजप उमेदवारावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा एका फोन कॉलमुळे शिवसेना शिंदे गटातील (Shivsena Shinde Camp) सर्व नाराजी दूर झाली आहे. तसेच जे काही मतभेद असेल ते सर्व दूर करण्याचे आश्वासन मिळाल्याने सर्व नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात आले.
ही निवडणूक देशाची निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये चांगले काम करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात 40 प्लस जागा निवडून आणण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्व मतभेद विसरून कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाल्याने शिवसेना शिंदे गटातील सर्व नाराजी दूर झाल्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख मारुती धिर्डे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे . या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख मारुती धिर्डे , भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख मधुकर मोरे,आरपीआय प्रदेश युवा अध्यक्ष विनोद थोरात , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांच्यासहित कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने भाजपच्या कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. कपिल पाटील 2014 आणि2019 मध्ये भिवंडीतून निवडून आले आहेत. यंदा त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचे कडवे आव्हान आहे. बाळ्यामामा या निवडणुकीत कपिल पाटील यांना जेरीस आणतील, असा अंदाज आहे. अशात महायुतीमधील अंतर्गत वाद कपिल पाटलांसाठी नुकसानदायक ठरू शकले असते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील शिवसैनिकांना फोन केल्याने त्यांचा कपिल पाटील यांना असणारा विरोध मावळला आहे.
हेमंत गोडसे ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या भेटीला
नाशिकच्या जागेवरून महायुतीत सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जागेचा गुंता अजूनही सुटलेला नाही. गेल्या तीन आठवड्यात हेमंत गोडसे यांनी 9 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. आजदेखील त्यांनी पुन्हा त्यांनी ठाणे गाठले आहे. उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वास ते व्यक्त करतायत तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत बाबासाहेबांना अभिवादन केले असून मतदारांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. भुजबळांकडून एकप्रकारे प्रचाराची सुरुवात झाल्याची चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागली आहे.
आणखी वाचा