सातारा : महाराष्ट्रातील लोकसभेच्या (Lok Sabha Election) 48 मतदारासंघांसाठी निवडणूक 5 टप्प्यात होणार आहे. महाविकास आघाडीनं (MVA Seat Sharing) लोकसभेसाठी जागावाटप जाहीर केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे,त्याची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, महायुतीला अद्याप काही जागांवर तिढा सोडवण्यात यश आलेलं नाही. यामध्ये प्रामुख्यानं सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत. नाशिकच्या जागेवर अंतिम निर्णय होत नसल्यानं साताऱ्याचा देखील तिढा सुटलेला नाही. महायुतीकडून दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
नाशिकचा तिढा वाढला
नाशिक लोकसभा मतदारसंघ देणार असाल तर साताऱ्याची जागा भाजपला सोडू अशी भूमिका अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. नाशिक मधून राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, या जागेवर सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. गेल्या दोन टर्ममध्ये या मतदारसंघातून हेमंत गोडसे विजयी झालेले आहेत. मात्र, या जागेवर उमेदवारी मिळत नसल्यानं हेमंत गोडसे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. आज देखील ते मुंबईला रवाना झाले आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी देखील या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढेल, असं जाहीर केलं आहे.
साताऱ्याची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षाचं कर्जत येथे शिबीर झालं होतं. अजित पवार यांनी सातारा, बारामती, रायगड आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार निवडणूक लढवतील, असं जाहीर केलं होतं. यापैकी अजित पवारांनी बारामती, रायगड, शिरुर या ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे अजित पवारांना उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नितीनकाका पाटील हे इच्छुक होते. मात्र, जागा वाटपाच्या चर्चेत सातारा लोकसभेची भाजपला द्यायची आणि त्याबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिकची जागा मिळणार असा निर्णय झाला होता. साताऱ्यात भाजपचे संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांनी प्रचार सुरु केला आहे. मात्र, त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
साताऱ्याच्या तहावर शिक्कामोर्तब कधी?
नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यात येईल हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. हा निर्णय झालेला नसताना दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सक्रीय झालेले नसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपनं आतापर्यंत 11 वेळा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे मात्र, साताऱ्याचा उमेदवार जाहीर केलेला नाही. नाशिकचा तिढा सुटल्यानंतर सातारचा उमेदवार जाहीर होणार का हे पाहावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील साताऱ्याच्या तहावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरचं अजित पवारांचे समर्थक प्रचारात सक्रीय होतील, अशी शक्यता आहे.
संबंधित बातम्या :