सांगली : सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी फेरविचार करण्याचा सल्ला महाविकास आघाडीला दिला असतानाच आता कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे आहेत. 


गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला आहे. हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका बसला नसून दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे 2019 मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्यावर आली. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जो इर्ष्येचा आणि कुरघोड्यांचा खेळ सुरु आहे त्यामध्ये कोण कोणाचा बळी देणार? याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. सांगलीच्या रिंगणात नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार? यामध्येही खेळ रंगणार आहे.


सांगली लोकसभेच्या आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना


दरम्यान, सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी पक्षाकडून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सांगली लोकसभेसाठी विद्यमान उमेदवार हे साखर सम्राट आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना लुबाडले आहे, अशा साखरसम्राटांना आणखी लुटण्यासाठी ताकद देऊ नये, यासाठी महेश खराडे आम्ही रस्त्यावर लढणारा उमेदवार दिला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. संघर्ष करणारा, प्रसंगी रक्त सांडणारा आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक गुन्हे अंगावर घेतलेत. तुरुंगवास भोगला आहे. ऊस दरासाठी जयंत पाटील यांच्या कारखान्यावर गव्हाणीत टाकलेल्या उड्या असो, खासदार संजय पाटील यांनी बुडविलेली ऊस बिले काढण्यासाठी त्याने संघर्ष करून 70 कोटींची ऊस बिले वसूल करून दिली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या