Prakash Mahajan : बीड लोकसभा मतदारसंघासाठी (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना दुसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात सामना रंगणार आहे...


तर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) जाहीर पाठींबा दिला आहे. यावरून मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांना तुम्ही आता पंकजा मुंडे यांचा प्रचार करणार का? असे विचारले असता त्यांनी रोकठोक उत्तर दिलं आहे.    


आता तर मी खुलेपणाने तिचा प्रचार करेल


एबीपी माझाशी संवाद साधताना प्रकाश महाजन म्हणाले की, निश्चित मी पंकजा मुंडेच्या (Pankaja Munde) प्रचाराला जाणार शेवटी माझं नातं तिच्याशी आहे. राज ठाकरे यांनी त्यावेळेस सुद्धा परवानगी दिली होती आणि आता तर आम्ही महायुतीमध्ये आहोत. मी आधी सुद्धा तिच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो होतो. आता तर मी खुलेपणाने तिचा प्रचार करेल. सन्मानाने महायुतीने (Mahayuti) बोलवलं तर नक्कीच आम्ही महायुतीचा प्रचार करू, असे उत्तर त्यांनी दिले आहे. 


आमचा कार्यकर्ता भावनाप्रधान 


महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार मनसे लोकसभेत करणार आहे का? असे विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, कार्यकर्ते हा प्रचार करण्यासाठी निश्चित तयार होतील.  काही किरकोळ स्थानिक प्रश्न असतात त्या सगळ्या ठिकाणी असतात.  आमचा कार्यकर्ता भावनाप्रधान आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


पंकजा मुंडेंची ताकद वाढणार


दरम्यान, राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्याचे विशेष महत्त्व असून प्रत्येक निवडणुकीत या जिल्ह्याची कायम चर्चा होते. महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांनी गावागावात जाऊन प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आता पंकजा मुंडे यांना त्यांच्या मामांचीदेखील साथ मिळाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची ताकद वाढणार असे बोलले जात आहे. मात्र बीड लोकसभा मतदारसंघात नक्की कोण बाजी मारणार? याचे चित्र 4 जूनलाच स्पष्ट होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या 


राज ठाकरे आधुनिक राजकारणातले कर्ण, भूमिका बदलणे जिवंतपणाचे लक्षण, प्रकाश महाजनांकडून स्तुतीसुमने


Pankaja Munde : 'मलाही वाटलं निवडणूक खूप अवघड होईल'; पंकजा मुंडे असे का म्हणाल्या?