Sangli Lok Sabha Constituency: सांगली : सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha Election 2024) जागेमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बिघाडी होतेय का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मविआचा (MVA) जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला ठरायच्या अगोदरच काँग्रेसचा (Congress) विरोध डावलून उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांची  उमेदवारी जाहीर करत मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. मिरजेतील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी चंद्रहात पाटलांना उमेदवारी जाहीर करुन टाकली. पण दुसरीकडे चंद्रहात पाटलांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नाराज असल्याचं दिसतंय. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची जाहीर झालेली उमेदवारी अद्याप अंतिम नसल्याची भूमिका काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आली असून काँग्रेसही सांगलीतून लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. 


उद्धव ठाकरे जनसंवाद सभेसाठी सांगली दौऱ्यावर आले आणि सांगली लोकसभेचा उमेदवार मशाल चिन्हावर जाहीर केला. याआधी सांगलीत ठाकरे यांनी वसंतदादाच्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधीस्थळी आलेल्या विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजाभाभी पाटील यांच्याशी संवाद साधला. पण हा संवाद साधल्यानंतर सभेत बोलताना मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या  सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मशाल चिन्हावर जाहीर केली. त्यामुळे वसंतदादाच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेऊन ठाकरेंनी केवळ औपचारिकता पाळली का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 


उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर चंद्रहार पाटील यांनी देखील ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवू, असं म्हणत कुस्ती असो वा इतर काहीही असो, मैदान मीच मारणार, हा संदेश देत विजयाचा दावा केला आहे. 


ठाकरेंकडून उमेदवारी घोषित झाल्यावर काँग्रेस नाराज


उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर मेळाव्यावर बहिष्कार टाकलेली काँग्रेस अधिकच नाराज झाली. महाविकास आघाडीचं जागा वाटप आद्यप अंतिम नाही, तोवर उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी ही उमेदवारी जाहीर केली. अंतिम जागा वाटपानंतर काँग्रेस जिल्ह्यातील निर्णय घेणार असून यासाठी तालुक्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील काँग्रेस नेते पुढील भूमिका घेणार असल्याचं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी म्हटलं आहे.


काँग्रेसच्या लोकसभेच्या बालेकिल्यात आता शिवसेना कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा घेऊन आपली मशाल पेटवू पाहतेय, हे  जिह्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना रुचललेलं नाही. त्यामुळे तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीच्या जागेवर दावा करायला सुरुवात केल्यावर  वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात एकेकाळी असलेल्या नात्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून अप्रत्यक्षपणे करण्यात आला, पण हा प्रयत्न आतापर्यंत तरी कामी आलेला नाही.  


नाना पटोले यांनी देखील सांगलीच्या जागेबाबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. पण आघाडीत वाटाघाटी सुरू असताना जागा जाहीर केल्यामुळे प्रॉब्लेमॅटिक झालं असल्याचं नाना पटोले बोलले आहेत. यावर संजय राऊत यांनी सौम्य भूमिका घेत नाना पटोले आमचे मित्र आहेत, दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे, यावर आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणताही वाद नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


सांगली लोकसभेत भाजपने विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देऊन प्रचाराला सुरुवात केली, आसताना मविआमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवार देण्यावरून चढाओढ सुरू आहे. ही चढाओढ एकच उमेदवार देऊन संपणार की, काँग्रेसही विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करून सांगली पुरती मैत्रीपूर्ण लढत मविआ करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या मैत्रीपूर्ण लढतीत भाजपला फायदा होणार की तोटा? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nana Patole : उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली अन् नाना पटोले संतापले, सांगलीच्या जागेमुळे महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी!