सांगली : शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 21 मार्च रोजी सांगलीचा उमेदवार जाहीर केला. मिरजेच्या (Miraj) सभेत बोलताना त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेनंतर आता चंद्रहार पाटील हिरीरीने प्रचाराला लागले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) तणाव निर्माण झाला आहे. ठाकरेंनी सांगलीचा (Sangli) उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय. 


नाना पटोलेंची जाहीर नाराजी


नाना पटोले यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नकोय. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेलं नाही, अशा शब्दांत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. 


सांगलीमुळे काँग्रेस-शिवसेनेत हमरी-तुमरी



सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होता. आम्ही कोल्हापूरची जागा सोडली. त्यामुळे सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. तर सांगली हा आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही ती जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेस या जागेवर विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात होती. मात्र उद्धव ठाकरेंनी भर सभेत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती. 


मर्द दिला, जिंकून देण्याचा मर्दपणा दाखवा 


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील मिरजच्या सभेत चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. हा अंदाज खरा ठरला. त्यांनी भर सभेत डबल महाराष्ट्र केसरी हेच सांगलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, असे सांगितले. मी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करतो. चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार आहे. मी इथे एक मर्द दिला आहे. त्याला जिंकून देण्याचा मर्दपणा दाखवा, असे उद्धव ठाकरे या सभेत म्हणाले.   


 


हेही वाचा >>


उद्धव ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर


Chandrahar Patil : जिद्दीला पेटलो तर स्वत:चंही ऐकत नाही, चंद्रहार पाटलांनी सांगलीच्या आखाड्यात शड्डू ठोकला