मुंबई : मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी ट्विट करुन राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना परखडपणे भूमिका मांडली. अर्थातच, त्यांच्या ट्विटचे महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून स्वागत होत असून भाजपा महिला नेत्या चांगल्याच संतापल्या आहेत. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना खुले पत्र लिहून काही सवाल उपस्थित केले. त्यानंतर,आता शिवसेना महिला नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही रेणुका शहाणेंना पत्र लिहून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. रेणुका शहाणे यांनी, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील गिरगाव आणि घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने मराठी माणसाला डावलणाऱ्यांना मत देऊ नका, असे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेवरुन आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यातूनच चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्र लिहिल्यानंतर आत सुषमा अंधारे यांनीही रेणुका शहाणेंना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये, चित्रा वाघ यांच्यावर लेडी सोमय्या अशी बोचरी टीकाही करण्यात आली.
मुंबईतील गिरगाव येथे मराठी "not welcome" म्हणणार्या आणि मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, असे रेणुका शहाणे यांनी म्हटले होते. रेणुका शहाणे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली. या सगळ्या वादात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेत रेणुका शहाणेंना पत्र लिहून काही सवाल उपस्थित केले. त्यानंतर, आता सुषमा अंधार यांनी रेणुका शहाणेंचं कौतुक केलं आहे.
प्रिय रेणुकाताई, नमस्कार...
आपण प्रत्यक्षात कधी भेटलो नाहीय. परंतु तुमच्या हसतमुख अभिनयाची मी प्रचंड चाहती आहे. सुरभी मालिकेपासून ते रिटा सारख्या अनेक चरित्र चित्रपटातल्या आपल्या भूमिका या मानवी मनाचे विविध कंगोरे दाखवणाऱ्या आहेत. आपला सशक्त अभिनय बघताना आपल्या संवेदनशील मनाची आणि आपल्या प्रगल्भतेची सुद्धा जाणीव माझ्यासारख्या प्रेक्षकाला सातत्याने होत राहते. "मराठी पिपल आर नॉट वेलकम" या मुद्द्यावर आपण घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. ज्या महाराष्ट्राच्या फिल्म इंडस्ट्रीने मराठीच नाही तर विविध प्रांतातून आलेल्या अनेक कलाकारांना कलेची दालनं नुसती खुली करून दिली नाही तर त्या सगळ्या जात धर्म आणि प्रांतांच्या कलाकारांना या मायानगरीने सामावून घेतलं. आदरातिथ्य केलं.. अनेकांच्या कित्येक पिढ्या खुशहाल झाल्या. त्या मायमराठी बद्दल या चंदेरी नगरातील आपल्यासारखी एक संवेदनशील अभिनेत्री अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आपलं म्हणणं ठामपणे मांडते. यासाठी आपलं मनःपूर्वक अभिनंदन..असे अंधारे यांनी म्हटलं आहे.
ताई आपण जितक्या ठामपणे भूमिका मांडली त्यानंतर त्यावर राजकीय किंतु परंतु करत निव्वळ आणि निव्वळ आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून आक्रस्ताळेपणा करणाऱ्या काही प्रतिक्रिया येतीलच. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे आहे.हे वेगळे सांगायला नको. पण ज्यांनी आक्रस्ताळेपणा केला किंवा आपल्या हेतूविषयी शंका व्यक्त केली तीच माणसं कोविडच्या काळामध्ये जेव्हा माणूस माणसाला ओळखत नव्हता. रक्ताची नाती या महाभयंकर आजारापुढे कमकुवत ठरत होती. अशा काळात महाराष्ट्राच्या फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं की सगळ्यात चांगलं काम हे महाराष्ट्र मुंबई विशेषता लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणाऱ्या धारावी पॅटर्नमध्ये झालं. धारावी पॅटर्नमध्ये राहणारे लोक फक्त मराठी नाहीत. ते भारतभरातून धारावी मध्ये स्थायिक झालेले विविध जाती धर्माचे भाषेचे आणि प्रांताचे लोक आहेत ज्यांची काळजी कुटुंबप्रमुख म्हणून तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. पण हे अशा आक्रस्ताळ्या लोकांना कळणार नाही, असे म्हणत एकप्रकारे चित्रा वाघ यांना लक्ष्य केलं.
लेडी सोमय्या म्हणत बोचरी टीका
पण निव्वळ इतरांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी लेडी सोमय्या बनत जे गलिच्छ आरोप करणारे लोक आहेत ते आजही या प्रश्नाचे उत्तर देत नाही की, कोविडच्या काळामध्ये एकीकडे भाजपशासित राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये प्रेतं नदीवर तरंगत होती, गुजरात मध्ये प्रेतं रस्त्यावर जाळली जात होती. अशा काळामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य ठरलं ज्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार त्या त्या जाती-धर्माच्या इतनामात झाले. या महाभयंकर महामारीच्या काळात राजकारण बाजूला ठेवत माणुसकी म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित होतं. पण भारतीय जनता पार्टीचे नेते हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याऐवजी पीएम केअर फंड मध्ये पैसे टाका असे अत्यंत निर्लज्जपणे सांगत होते. या पीएम केअर फंड बद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता माहिती मागितली असता हा फंड खाजगी होता असे उघड झाले, असेही अंधारे यांनी पत्रात लिहिले आहे. यावेळी, त्यांनी नाव न घेता लेडी सोमय्या म्हणत चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केलीय.
महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी निधी न देता तो बाहेर पोहोचवणारे हे लोक खरंच यांना इतरांना प्रश्न विचारण्याचे अधिकार मिळतात का? ज्या मुद्द्यांना घेऊन आक्रस्ताळेपणा केला जातोय ते मुद्दे आयुक्त चहल आणि आता त्यांच्याकडेच गेलेल्या खोपकर आणि कितीतरी नावं सांगता येतील. यांच्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. या काळात स्थायी समिती ज्यांच्याकडे होती ते यशवंत जाधव यामिनी जाधव कुटुंब. ज्यांच्यावर ढिगाने आरोप व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्यांनी केले त्यांना आता निवडणूक प्रचारात उतरवणारे लोक यांना खरंच मराठीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का?, असा सवालही अंधारे यांनी विचारला.
म्हातारी मेल्याचे दु:ख नसते, पण..
असो , आपल्यासारख्या अभिनय क्षेत्रातल्या गुणी अभिनेत्रीला मात्र या सगळ्या राजकारणात कुणीही ओढू नये असे फार मनापासून वाटते. या निर्बुद्ध लोकांना याचीही कल्पना नाही की मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या आणि पुढे हिंदी , कन्नड, तेलगू, तमिळ अशा विविध चित्रपटांमधून सशक्त अभिनयाची कारकीर्द गाजवणाऱ्या आशुतोष राणांच्या आपण अर्धांगिनी आहात. म्हणूनच नाईलाजाने कधी कधी आक्रस्ताळेपणा करणाऱ्या लोकांना उत्तर देणे अपरिहार्य ठरते. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ
मा.रेणुकाताई शहाणे,
जय महाराष्ट्र आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा,परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे.
भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान व सन्मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.
आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते.
पण मी आपणास विचारू इच्छिते की, आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्वत: खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात.
मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतुकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे.
आपणास एक प्रश्न विचारते की कोविडमधे पिपिई किट्स,बॉडी बॅग्स,मास्क,औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडोंची रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले.
अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्पर मौन बाळगणार का?