झक मारली, पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, घणाघाती टीका
झक मारली आणि पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं, अशी घाणाघाती टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून पवार कुटुंबीयांवर केली आहे.

पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा संघर्ष टोकाला गेला असून काही ठिकाणी ओबीसी आणि मराठी सामने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली असताना दुसरीकडे ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध करत लक्ष्मण हाके (Laxman hake) यांनी मेळावा आणि दौऱ्यांमधून ओबीसींना एकत्र करण्याचं काम सुरू केलंय. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शरद पवाराच्या बारामतीमध्ये जाऊन त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही त्यांनी ओबीसी (OBC) बांधवांसह मोर्चा काढत पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. आता, पुन्हा एकदा हाकेंनी पवार (Ajit pawar) कुटुंबीयांवर घणाघाती टीका केलीय.
झक मारली आणि पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं, अशी घाणाघाती टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून पवार कुटुंबीयांवर केली आहे. 5 सप्टेंबरला बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं, याला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लक्ष्मण हाके यांच्यासह आज 14 जण बारामती पोलीस ठाण्यामध्ये आले होते, तेव्हा आम्हाला अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांकडून नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलं असलं तरी यावरून मोठे राजकारण सुरू झाले. लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले असून अजित पवारांच्या सांगण्यावरुनच आम्हाला अटक करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांवर टीका (Ajit pawar by laxman hake)
पवार कुटुंबीयांनी आमच्या मागच्या 4 पिढ्या संडवल्या आणि पुढच्या 4 पिढ्या शिकू नये म्हणून महाज्योतीला निधी देत नाहीत, वसतिगृह बांधू देत नाहीत. एखादा पोरगा बोलायला लागला की त्याच्यावर अजित पवार गु्न्हे दाखल करतात, अशा शब्दात लक्ष्मण हाकेंनी पवार कुटुंबावरच आपण टीका का करतो हे बारामतीतून सांगितलं. अजित पवारांच्या सांगण्यावरून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. तर पवार कुटुंब गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसलंय, आम्ही पवारांना झक मारायला निवडून दिलं, असा शब्दात हाकेंनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, आर्थिक निकषावरच आरक्षण द्यायला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्यावरुन, सुप्रिया सुळे ह्या उत्कृष्ट संसदपटू नसून निकृष्ट संसदपटू असल्याचंही हाकेंनी म्हटलं.























