Lamborghini in Mantralaya : मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी (Lamborghini) कार आली होती. विशेष म्हणजे, सर्व सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायला तासंतास वाट बघावी लागते. मात्र या कारची चेकिंग न करताच मंत्रालयात एन्ट्री देण्यात आली. तर या कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. या कारच्या एन्ट्रीने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना भेटण्यासाठी या कारमधून एक व्हिआयपी व्यक्ती आल्याची माहिती समोर आली होती. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लॅम्बोर्गिनीच्या मालकाचे नाव सांगत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लॅम्बोर्गिनीच्या विषय लावून धरत आहेत. मंत्रालयामध्ये काळ्या रंगाची कार आली होती आणि ती कार कोणाची होती? असे प्रश्नचिन्ह त्यांनी या आधी उपस्थित केले होते. या काळा रंगाच्या गाडीचे मालक कुमार मोरदानी नावाची व्यक्ती आहे. त्यांच्यावर अनेक बँकांना चुना लावल्याचा गंभीर आरोप आहे. 202 कोटींचे कर्ज दुसऱ्या प्रकल्पासाठी वळवण्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा विषय याआधी सभागृहामध्ये देखील आला होता. त्यावेळेस नितेश राणे आणि काही महत्त्वाच्या मंत्र्यांनी हा विषय सभागृहात मांडला होता. आता रोहित पवारांनी या व्यक्तीवर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केलाय. 






रोहित पवारांचा गंभीर आरोप


रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय की, व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील काळी गाडी. या काळ्या गाडीच्या मालकाचे नाव आहे कुमार मोरदानी. या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे 50 हून अधिक कंपन्या ministry of corporate affairs कडे नोंद असून या महागड्या व्यक्तीने अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. त्यामध्ये ग्राहकांनी ज्या प्रकल्पासाठी 19 कोटी दिले, बँकांनी ज्या प्रकल्पासाठी 202 कोटीचे कर्ज दिले ते पैसे त्या प्रकल्पासाठी न वापरता 221 कोटीपैकी 196 कोटी दुसरीकडेच वळवले, शिवाय प्रकल्पाला 6 मजल्यांची परवानगी असताना 13 मजले बांधले आणि रेरा कायद्याचंही उल्लंघन केलं, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?