Lamborghini in Mantralaya : बुधवारी मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी (Lamborghini) कार आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना भेटण्यासाठी या कारमधून व्यक्ती आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, सर्व सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायला तासंतास वाट बघावी लागते. मात्र या कारची चेकिंग न करताच मंत्रालयात एन्ट्री देण्यात आली. तर या कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे कारमध्ये नेमकं कोण होतं? याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही आलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो, त्याच ठिकाणी थांबल्याने आलिशान कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
काल मंत्रालयामध्ये काल ही आलिशान लॅम्बोर्गिनी कार आली होती. मंत्रालयात जर कुठलीही गाडी येणार असेल तर त्या गाडीचा पास काढावा लागतो किंवा स्पेशल पास घ्यावा लागतो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात यायचं असेल तर पास काढणे आवश्यक आहे. सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र काल ही आलिशान कार मंत्रालयाच्या गेटवर आल्यानंतर त्यावेळी कुठल्याही प्रकारची कारची चेकिंग करण्यात आली नाही. ही कार थेट मंत्रालयामध्ये दाखल झाली. भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या गाडीतून भेटण्यासाठी व्यक्ती आलेली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हीच व्यक्ती कार चालवत आतमध्ये आली मात्र आणखी कोणी कारमध्ये होते का? हे अद्याप समजू शकलेले नाही.
आलिशान लॅम्बोर्गिनीमध्ये नेमकं कोण होतं?
कारण गाडीच्या काचा संपूर्णपणे काळ्या होत्या. गाड्यांच्या काचांना काळ्या रंगाची फिल्म लावता येत नाही, असे मुंबई पोलिसांचे नियम आहेत. मात्र काळ्या काचा असलेल्या आलिशान कारने थेट मंत्रालयात प्रवेश केल्याने या कारची जोरदार रंगली आहे. तर यावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसून येत आहे. सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर अटी-नियम घालण्यात आले आहेत. मात्र, व्हीआयपीला तात्काळ प्रवेश दिला जातो, अशी टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, या आलिशान कारमध्ये नेमकं कोण होतं? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
काय म्हणाले संजय राऊत?
या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, ते एक गूढ आहे. धूमकेतूप्रमाणे ती उगवली आणि निघून गेली. तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या हातामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा