Ramdas Kadam On Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या नेत्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या (Balasaheb Thackeray Smarak) अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदार कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2022 मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली होती. तेव्हा मोठा वाद झाला होता. 


बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तसेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललात, अमित शाह यांच्यावर टीका केलीत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटताय. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.


...तर बाळासाहेबांना अतिशय दु:ख होईल- रामदास कदम


उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले, तर बाळासाहेब ठाकरेंना खूप दुःख होईल. त्यांच्या मनाला वेदना होतील. माझे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो, असा विचार ते करतील. ही बाब होणे आवश्यक आणि गरजेची आहे, अशी मागणी रामदास कदम यांनी केली.


मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी कोणी विचार सोडले?- एकनाथ शिंदेंचा सवाल


रामदास कदम अंत्यत योग्य बोलले आहेत. त्यांनी वक्तव्य केलं की, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलवणार नाही. अरे कार्यक्रम कोणाचा आहे. स्मारक कोण बांधतंय, सरकार ते बांधतयं, बाळासाहेब लोक विचारांचे होते. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले. मग ते कोणाला लागू होतं, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच कोण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलं?, स्वत:च्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी कोणी विचार सोडले. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली. 




संबंधित बातमी:


संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी बदलली; नवीन SIT टीममध्ये कोण कोण?