मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील इम्पॅक्टफूल योजना असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच, राज्य सरकारच्या महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते लाडकी बहीण योजनेवरुन महिला भगिनींशी संवाद साधत आहेत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमांतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं गुलाबी वादळ सर्वत्र धडकत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही लाडक्या बहि‍णींना (Ladki bahin Yojana) भेटून योजनेबद्दल प्रतिक्रिया घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका लाडक्या बहिणीची भेट घेऊन तिने सुरू केलेल्या व्यावसायाची माहिती घेतली होती. आता, त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या लाडक्या बहि‍णींशी म्हणजेच आत्याबाईंशी फोनवरुन संवाद साधला आहे. धुळे जिल्ह्यातील एका लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला व्हिडिओ कॉल करुन त्यांचे आभार मानले.  


शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’तील लाभार्थी बहिणीशी व्हिडिओ कॉलमधून संवाद साधला. या बहिणीने योजनेतून मिळालेल्या पैशांमधून नवीन भांडी घेतली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव टाकले होते. त्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करुन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ लाभार्थी महिला या, माझ्या भावानं मला पैसे पाठवले, मग मी भावाचं नाव हंड्यांवर टाकलं, असं म्हणताना दिसत आहेत.




एकनाथ शिंदेंनीच केला होता व्हिडिओ शेअर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही व्हिडिओ ट्विट करत या बहिणीचे प्रेम पाहून भावूक झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, आज त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ करुन या महिला लाभार्थी आत्याबाईंशी संवाद साधला. ''1500 रुपयांत काय होते, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी आमच्या बहिणींना मायेची भेट देण्याचे समाधानच इतके मोठे होते की क्षुल्लक टीका आम्ही नजरेआड केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आजवर मनाला मुरड घालत असलेल्या आवडीच्या गोष्टी कुणी घेतल्या, कुणी छोटेखानी व्यवसाय केला. आम्ही देत असलेली ओवाळणी बहिणी प्रेमाने स्वीकारत आहेत, यातच आमचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसेच, धुळ्यातील एका भगिनीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या 4500 रुपयांतून पितळ्याचे दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर भावाकडून सप्रेम भेट म्हणून माझे नाव टाकले, ते पाहूनही आनंदाश्रू तरळले असं भावनिक ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन केलंय.   






पुढील 5 वर्षे चालणार लाडकी बहीण योजना


दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचं काम महायुती सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महिलांशी मेळाव्यांच्या माध्यमातून संवाद साधत लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरूच राहणार असल्याचे म्हटले. तसेच, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. 


हेही वाचा


आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो