Kishori Pednekar on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार करत बसू नका. आपल्याला 225 ते 250 जागा लढवायच्या आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सणसणीत टोला लगावलाय. "स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम राहा, आता जुगाड करू नका", अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय.
मनसेच्या या विविध पथकांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्व्हेदेखील पूर्ण केला
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यातून रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची (MNS) रणनीती, उमेदवारांची निवड कशी होईल, याबाबत भाष्य केले. निवडणुकांपूर्वी इतर पक्ष सर्वेक्षणं करतात. पण मी आपल्याच पक्षातील चार ते पाच लोकांची टीम तयार करुन प्रत्येक जिल्ह्यात पाठवली होती. याची मनसेच्या अनेक तालुकाध्यक्षांना कल्पनाही नव्हती. मनसेच्या या विविध पथकांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्व्हेदेखील पूर्ण केला आहे. त्याचा अहवालही माझ्याकडे आला आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले.
मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे
तसेच मनसे सोडण्याच्या तयारी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयीही राज ठाकरेंनी भाष्य केलं. मी विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी बघत होतो. कोण कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नाही. आपल्यातील काही लोकही जाण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे आणि स्वत:चे नुकसान करुन घ्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.