Nilesh Lanke अहमदनगर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) गेल्या चार दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या विरोधात अहमदनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला (Hunger Strike) बसले होते. अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मध्यस्थीला यश आले आहे.


खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून स्थानिक गुन्हे शाखेतील (Ahmednagar LCB) भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळ्या असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचा आरोप लंके यांनी पत्रात केला होता. हप्ते गोळा करणार्‍यांवर पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी निलेश लंके यांनी केली होती. 


अखेर खासदार निलेश लंकेंचे उपोषण चौथ्या दिवशी मागे


पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने खासदार निलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरु होती. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी निलेश लंके यांना पोलीस विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची 15 दिवसात चौकशी होणार, असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आणि बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषण सोडले. 


निलेश लंके यांनी पाठवले होते मुख्यमंत्र्यांना पत्र 


खासदार लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख झाली आहे. शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन क्लब, अवैध वाळू उपसा, गुटखा, अवैध दारू विक्री, मटका, चंदन तस्करी, बिंगो यांसारखे व्यवसाय सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे त्याला अभय आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ते वसूल करत सामान्य लोकांना वेठीस धरतात. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सराफ व्यापाऱ्यांकडून पैसे उकळतात, असे गंभीर आरोप निलेश लंके यांनी केले होते. गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश करावेत. कारवाई न झाल्यास पुराव्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे खा. निलेश लंके यांनी पत्रात म्हटले होते. 


आणखी वाचा 


Nilesh Lanke : विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला