Ghatkopar Hoarding Accident Update : मुंबई : घाटकोपर पेट्रोल पंप (Ghatkopar Petrol Pump) आणि होर्डींग (Ghatkopar Hoarding Accident) जाहिरातीचा फळकाची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) पोलीस हौसिंगची जागा आहे, असं म्हणत भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा घणाघाती आरोप केले आहेत.


2020-21 मध्ये उद्धव ठाकरे सरकारनं बेकायदेशीररित्या एका खाजगी कंपनीला या जागेवर होर्डिंग लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं, असा आरोप किरीट सोमस्या यांनी केला आहे. तसेच, पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई 25 कोटी रुपयांची आणि होर्डिंगची वार्षिक कमाई 25 कोटी रुपयांची, म्हणजेच, घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगची वार्षिक कमाई 50 कोटींची, मग मातोश्री आणि भांडुपचा हिस्सा किती? असा सवालही किरीट सोमय्यांनी विचारला आहे. 


घाटकोपर पेट्रोल पंप, होर्डींगची जागा महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हौसिंगची : किरीट सोमय्या 


घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये किरीट सोमस्यांनी उद्धव ठाकरे सरकार आणि संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. ट्वीटमध्ये किरीट सोमस्यांनी म्हटलंय की, "घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगची वार्षिक कमाई 50 कोटी, मातोश्री आणि भांडुपचा हिस्सा किती? घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डींगची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हौसिंगची जागा आहे. 2020-2021 मधे उद्धव ठाकरे सरकारनी बैकायदेशीररित्या LORD’S MARK INDUSTRIES LTD. या खाजगी कंपनीला आणि या जागेवर होर्डिंग लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट भावेश भिंडे यांच्या मे. इगो मीडीया प्रा. लि. कंपनीला दिलं. पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई ₹25 कोटी आणि होर्डिंगची वार्षिक कमाई ₹25 कोटी. भावेश भिंडेला आमदार सुनील राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. शिवबंधन बांधले होते. संजय राऊत या 50 कोटींतून मातोश्रीला किती पैसे जातात आणि भांडूपला किती पैसे येतात? याचा हिशोब द्यावाच लागणार."


घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, अजूनही बचावकार्य सुरूच


घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 16 वर पोहोचला आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत 41 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 50 तासांपासून रेस्क्यू काम सुरू आहे. आतापर्यंत होर्डिंगचा 50 टक्के सांगाडा पेट्रोल पंपावरून बाहेर काढण्यात आला आहे. होर्डिंगच्या सांगाड्याखाली लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ज्या पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग पडून अपघात झाला तो संपूर्ण पंपच अनधिकृत असल्यातचं समोर आलं आहे. हा भूखंड गृहखात्याचा असून महसूल विभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वाणिज्य कामासाठी वापरला जात होता. त्याबाबत पोलीस गृहनिर्माण महामंडळाला अहवाल मागवला होता. या भूखंडावर पेट्रोल पंप कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची विचारणा करण्यात आली होती. मात्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाने वेळोवेळी पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत सुरू असलेल्या पेट्रोल पंप बांधकामावर हरकत घेतली होती. हे बांधकाम थांबवणयाबाबत पोलिस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृहविभागाला पत्र व्यवहार करून परवानगी नाकारल्याचा अभिप्राय देण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे.