बीड - राज्याच्या बिग फाईट लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे (bajrang Sonvane) अशी थेट लढत आहे. वंचित बहुजन आघाडीकडूनही बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. तर, गेल्या अनेक दिवसांपासून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा होती. राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनामुळे बीड हे केंद्रस्थानी आहे. त्यामुळे, ज्योती मेटेंच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे ज्योती मेटेंनी जाहीर केले. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे, ज्योती मेटेंच्या उमेदवारी अर्ज न भरण्याचा थेट फायदा बजरंग सोनवणे यांना होईल, असे दिसून येते.   


बीड लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ज्योती मेटेंनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. यासाठी, त्यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही दोनवेळा भेट घेतली. मात्र, आज पत्रकार परिषद घेऊन ज्योती मेटे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे सर्व जनतेची इच्छा निवडणूक लढावी अशी आहे, मात्र काही गोष्टींचा विचार करून मी या निवडणुकीतून माघार घेत असल्याच ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले. 


मेटेंचा पाठिंबा कोणाला?


विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आणि राजकारणात सक्रिय राहण्यासाठी मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असून समाजहित हेच मला सर्वस्व आहे. त्यामुळे आपण निवडणूक लढविणार नसल्याचे मेटे म्हणाल्या.तर लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय प्रदेश पातळीवर बैठक घेऊन ठरवणार असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केलं. त्यामुळे, ज्योती मेटे बीड लोकसभेत उमेदवार नाहीत हे निश्चित झालं असलं तरीही त्यांच्या संघटनेचा पाठिंबा कोणाला असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


जरांगेंचा पंकजा मुंडेंना इशारा


बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना महाविकास आघाडी उमेदवार बजरंग सोनवणे यांचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होत आहे. त्यातच, पंकजा मुंंडेंनी मनोज जरांगेंच्या उपोषणावरुन भाष्य केल्यानंतर जरांगे यांनीही पंकजा मुंडेंना इशारा दिला आहे. मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, माझ्या वाट्याला जाऊ नका असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांना इशारा दिला आहे. उपोषण करुनच आरक्षण मिळाले, उर्वरित समाजालाही आरक्षण मिळेल असंही जरांगे म्हणाले.  उपोषण करुन आरक्षण (reservation) मिळत नसते असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा


Video: ''पूर्वी आम्ही घास घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, इकडे आलो तर अदानी-अंबानीही ओळखतात''