Beed Lok sabha : लोकसभा निवडणुकीत राज्यातील महत्त्वाच्या लढतींकडे महाराष्ट्रासह (Maharashtra) देशाचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार, अमरावतीमध्ये नवनीत राणा, माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांसह बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) मतदारसंघात मोठ्या लढती होत आहेत. भाजपाने प्रीतम मुडेंऐवजी यंदा पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. आपली इच्छा नसतानाही केवळ पक्षाचा आदेश असल्याने आपण निवडणूक लढवत असून दिल्लीची तयारी केल्याचं पंकजा यांनी यापूर्वीच म्हटले आहे. आता, पुन्हा एकदा बीड (Beed Loksabha) जिल्ह्यातील घाटनांदूर येथील निवडणूक प्रचारादरम्यान पंकजा यांनी नागरिकांना, मतदारांना आवाहन करताना मी केवळ आपल्या भागाच्या विकासासाठी दिल्लीत जात असल्याचे म्हटले. यावेळी, अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी थेट उद्योगपती मुकेश अंबानींचा उल्लेख केला. 


बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथील भाषणात पंकजा यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी, नाव न घेता बजरंग सोनवणे आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. मी 18 वर्षाची असताना भाषण सुरू केले, आज मला 40 वर्षे झाले असल्याचं सांगत पंकजा यांनी आपल्या भाषणातील मुद्द्यांचा अपप्रचार होत असल्याचे म्हटले. मी कधीही वेगळं वक्तव्य केलं नाही, माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने दाखविले, असे पंकजा यांनी म्हटले. 


आजची निवडणूक मोठ्या महायुद्ध पेक्षा कमी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हून माझी उमेदवारी जाहीर केली आहे. मला दिल्लीत जायची हाऊस आहे, म्हणून मी उमेदवारी मागितली नाही. तर, ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. माझी मागणी प्रीतम मुंडे यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली होती. मात्र, भाजपाच्या कोअर कमिटीने माझे नाव घेतले. त्यामुळे, या निवडणुकीत राजकारण आणण्याची गरज नाही. माझ्या हातात तराजू आहे, पण सध्या मी उज्वल भविष्यात अडचण आणणारी परिस्थिती पाहत आहे, असे म्हणत खोटा प्रचार करणाऱ्यांना पंकजा यांनी लक्ष्य केले. तसेच, जिल्ह्यातील कुठलाही व्यक्ती माझ्या दारावर आला असता मी कधीही त्याची जात विचारली नाही. मी निवडणूक हरल्यावर पाच वर्षात हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांचे जीव वाचविल्याचेही पंकजा यांनी सांगितले.


अंबानी मला विचारतात


ज्यांना पाच लाख नऊ हजार मते गेल्या लोकसभा निवडणुकीत घेतले त्यांनी काय काम केले हे मी विचारणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि प्रतिस्पर्धी बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मी माझ्या जिल्ह्यात रेल्वे, रस्ते आणले, पुढच्या वर्षी परळी पर्यंत रेल्वे येईल. तर, मोठे उद्योगही त्यांच्याकडून आणण्याचा माझा प्रयत्न राहील. मुकेश अंबानी भेटले की मला कैसे हो पंकजा? म्हणून विचारतात, असा दाखलाही पंकजा मुंडेंनी दिला. त्यामुळे, अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात मुकेश अंबानींचाही बोलबाला असल्याचे दिसून आले. 


या मातीत माझा बाप गेला


विकासकामांसाठी बांधणारा धागा मला बनायचे आहे, कात्री नाही. आता मला संधी द्या, तुम्ही म्हणाल त्याला पुढील वर्षी खासदार करेन. त्यामुळे, बीड जिल्ह्याच्या उज्वल विकासासाठी मला निवडून द्या. देशाने आपल्याकडे पाहिले पाहिजे असा संदेश मतदानातून द्या. या मातीत माझा बाप गेला आहे, मी कधीही आपली मान खाली घालू देणार नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी बीडमधील नागरिकांना उद्देशून भाषण केले.


जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका


दरम्यान, सध्या अनेकजण उपोषण करत आहेत, उपोषण करुन काहीही भेटत नसते, असे म्हणत नाव न घेता पंकजा मुंडेंनी जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.