पुणे : गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे चांगलेच चर्चेत आहेत. मी बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही, असं शिवतारे म्हणाले होते. निवडणूक लढवण्याची भूमिका घेताना शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टोकाची टीकाही केली होती. आता मात्र त्यांनी माघार घेत, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना विंचू म्हणणारे शिवतारे आज मात्र त्यांचे गोडवे गात आहेत. अजित पवार हे कार्यस्रमाट नेतृत्त्व आहे. ते लोकांसाठी झटणारे नेतृत्व आहे, असे शिवतारे म्हणाले. 


अजित पवार कार्यसम्राट, लोकांसाठी झटणारे नेतृत्व


विजय शिवतारे सध्या बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत. ते आज बारामतीत एका प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. व्यापक हितासाठी मी ही निवडणूक न लढवण्याचे ठरवले. बारामतीच्या निवडणुकीला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अजित पवार हे कार्यसम्राट नेतृत्त्व आहे. अजित पवार हे लोकांसाठी झटणारे नेतृत्त्व आहे, असे शिवतारे म्हणाले. 


3 लाख मतांच्या फरकाने बारातमीची जागा जिंकणार


तसेच पुढे बोलताना सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करण्याचाही सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. आपले बूथ सांभाळा. विजय आपलाच आहे, असे शिवतारे म्हणाले. तसेच बारामतीची जागा आपण 3 लाख मतांच्या फरकाने जिंकू, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे


दरम्यान, बारामती या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. तसं पाहायचं झालं तर या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी मी ही निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका घेतली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतारे यांच्याशी चर्चा करून त्यांना माघार घ्यायला रावली होती. आता शिवतारे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत.  


हेही वाचा :


माजी मुख्यमंत्र्यांचा जावई अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार? ऐन निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का!


माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर


दागिने विकून गाय घेतली, आता मेहनतीच्या जोरावर झाली करोडपती; महिलेच्या जिद्दीला देशाचा सलाम!