मुंबई : लोकसभा निवडणुकानंतर राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जांगासाठी आज आमदारांचं मतदान सुरू आहे. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 246 मतदान झाले असून या मतदानावेळी राजकीय नेत्यांच्या हसतखेळत गप्पा पाहायला मिळाल्या आहेत. विधानभवनात (Vidhanbhavan) मतदानासाठी आलेल्या आमदारांनी एकमेकांना भेटून हसत-खेळत गप्पा मारल्यानंतर या भेटीचे व्हिडिओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार (Ajit pawar) यांनी जयंत पाटलांशी (Jayant Patil) मत हातात हात देऊन गप्पा मारल्या आहेत. तर, संजय राऊत आणि अजित पवारांचं हस्तांदोलनही अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. दररोज एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) चक्क उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात हात घातल्याचं पाहायला मिळालं.
सकाळचा भोंगा म्हणून नेहमीच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जाते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडूनही नाव न घेता संजय राऊतांवर असाच हल्लाबोल केला जातो. मात्र, जेव्हा हे नेते समोरासमोर येतात तेव्हा हसत खेळत हस्तांदोलन करतात, एकेमकांशी गप्पा मारत असतात, हे वास्तव आहे. विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून या मतदानावेळी असे अनेक प्रसंग, क्षण पाहायला मिळाले आहेत. अजित पवार यांचा संजय राऊतांसमवेतच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून अजित दादांनी संजय राऊतांना दोन हातांनी हस्तांदोलन केल्याचं दिसून आलं. तर, जयंत पाटील यांच्याशी काही क्षण थांबून अजित पवारांनी गुप्तगू केल्याचं दिसून आलं. विधानपरिषदेतील या दोन्ही भेटीवरुन राजकीय अर्थ लावले जात आहेत. मात्र, ही केवळ अनावधानाने झालेली भेट असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.
व्हिडिओ : https://youtube.com/shorts/kI9KLJBFOaM?si=bdCvWCfMgpqUJXIs
संजय राऊत- चंद्रकांत पाटलांची भेट
संजय राऊत आणि चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली. त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले मी तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो. तर, अरे व्वा..आपण परत एकत्र यायलाच पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे, संजय राऊतांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आमच्या गाठीभेटी होतच असतात. आम्ही दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही अशाप्रकारे भेटतच असतो, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.