''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रविंद्र धंगेकर व्यासपीठासमोर बसले
पुणे - लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेटवचा दिवस आहे. त्यामुळे, पुणे, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला. यावेळी, सुप्रिया सुळेंनी नाव न घेता दादा-वहिनींना टोलाही लगावला. मी शांताबाई पवार यांची नात असून मला रडायला नाही, तर लढायला शिकवलेलं आहे, असे सुळेंनी म्हटले. या सभेदरम्यान महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार व्यासपीठावरुन खाली येत मंडपासमोर बसले. त्यावरुन, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पोलिसांना चिमटा काढला.
महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी सभा घेऊन जनतेला संबोधित केले. या सभेदरम्यान, हे तिन्ही उमेदवार व्यासपीठावरुन खाली येऊन मंडपासमोर बसले. त्यावेळी, भाषण सुरू असलेल्या जयंत पाटलांनी पोलिसांना चिमटा काढला.
जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रविंद्र धंगेकर व्यासपीठासमोर बसले. त्यावेळी, पोलिसांनी आम्हाला छोट्या जागेची व्यवस्था केली. पदोपदी अन्याय हे आम्हाला सांगणं आवश्यक आहे. कारण, मोठ्या रस्त्यावर जागा दिली असती तर बरं झालं असतं. तीन पक्षाचे कार्यकर्ते येथे आलेले आहेत. पण, इथं बसायला जागा नाही. पोलिसांचा दृष्टीकोन कसा अन्यायकारक आहे, हे तुम्ही सिद्ध केलंय. पण, दिवस बदलत असतात लक्षात ठेवा, असा चिमटा जयंत पाटील यांनी पोलिसांना काढला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांचा खाली बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून फोटोही समोर आले आहेत. या फोटोसह, कायम जमिनीवर असलेले नेते म्हणून तिन्ही उमेदवारांचा उल्लेख महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून केला जात आहे.
सुप्रिया सुळेंचा दादा-वहिनींवर निशाणा
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर निशाणा साधला. मला म्हणतात हे रडत बसतील. पण, लक्षात ठेवा, शारदाबाई पवारांची नात आहे मी, रडत बसणारी नाही. मला लढायला शिकवलं आहे, रडायला नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दादा वहिनींना टोला लगावला. तसेच, गेल्या 10 वर्षात आपण केलेल्या कामावरुनही त्यांनी निशाणा साधला. मी दहा वर्षे निधी आणला नाही, त्यांना माझा कार्य अहवाल मी चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे. तो अहवाल मराठीतही आहे, असा टोलाही अजित पवारांना लगावला. तसेच, त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते मलाचं मतदान करतील. (कार्य अहवाल वाचून अजित पवारांचं कुटुंब मला चं मतदान करेल, असं सूचित केलं).
रविंद्र धंगेकरांसाठी घोषणा
मी नशिबवान आहे, मला तुतारी हे चिन्ह मिळालं. तुतारी सर्व शुभकार्यासाठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. आपल्याला ही तुतारी रविंद्र धंगेकर यांच्याहाती द्यायची आहे. शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली. आमच्या एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हाती मशाल आहे. रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.