(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sujay Vikhe Patil: शेवटचा डाव जयंत पाटील टाकतील; सुजय विखेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
Maharashtra Politics: शरद पवार गटातील आमदार फुटणार असल्याचा चर्चा. जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार, ही चर्चा काही थांबायला तयार नाही. सुजय विखे-पाटलांचं वक्तव्य
अहमदनगर: शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी बोलून दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने (BJP) राजकीय फोडाफोडीचे डावपेच वापरायला प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक वक्तव्य केले होते. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये पक्ष पळवण्याची स्पर्धा सुरु आहे. पण वेळ आल्यावर शरद पवार (Sharad Pawar) हे शेवटचा डाव टाकतील, असे वक्तव्य करुन जयंत पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार सुजय विखे-पाटील यांनी खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. ते गुरुवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी सुजय विखे-पाटील यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जयंत पाटील हे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटचा डाव टाकतील, असे म्हणतात. पण जयंत पाटील हेच शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार आहेत, ते विचारुन घ्या. नाहीतर शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकायचे, अशी मिश्कील टिप्पणी सुजय विखे यांनी केली. काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या तीन नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महायुतीमध्ये प्रवेश केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यामुळे उडालेला धुरळा खाली बसला नाही तोच शरद पवार यांच्या जवळचा नेता भाजपमध्ये जाणार, अशी नवी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेचा रोख जयंत पाटील यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. परंतु, शरद पवार गटाकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी ही बातमी पेरण्यात आल्याचे सांगण्यात आले. तरीही जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार, ही चर्चा काही थांबायला तयार नाही. शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाजप खासदार सुजय विखे यांनी आता कॉंग्रेस पक्षच काही दिवसांनी संपुष्टात येणार असल्याचे म्हटले.
सुजय विखेंचा संजय राऊतांना टोला
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी मुंबईचा सौदा केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांनी मागच्या चाळीस वर्षांपासून मुंबई विकली, त्यांनी काही ठेवले आहे का विकायचे? मात्र, आज जो विकास सुरू आहे, त्या विकासाबाबतचे पैसे त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांची मळमळ सुरु आहे. ज्यांच्या नेत्यांकडे कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाचे साधन नसताना कोविडच्या पैशातून महागड्या गाड्या वापरतात आणि दौरे करतात त्यांनी इतरांना प्रश्न विचारू नये, असे खडे बोल सुजय विखेंनी राऊतांना सुनावले.
आणखी वाचा
संकट काळात शरद पवारांसोबत राहायचं, चिन्ह आणि नावाची काळजी नाही : जयंत पाटील