Jayant Patil on Mahayuti : "विधानसभेला महायुतीचे शंभरच्या आत आमदार निवडून येणार आहेत, यापेक्षा आधिक जागा आल्या तर अन्यथा माझे नाव बदला", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुतीला ओपन चॅलेंज दिलं आहे. पुण्यातील मंचरमध्ये राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पोहोचली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरुरचे खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते. 


दिल्लीला जाता मात्र कांदा उत्पादकांची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नाही


कांद्यावरील निर्यातबंदी विरोधात दिल्लीत बोलण्याऐवजी नाशिकमध्ये जाऊन माफी मागायची वेळ आलीय. खुर्च्या टिकवण्यासाठी रात्रभरात दहा वेळा दिल्लीला जाता मात्र कांदा उत्पादकांची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नाही. आता कांदा संपल्यावर माफी मागताय, असा टोलाही जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. 


400 पार जाणारा वारु 240 वर अडकला, त्यामुळे दोन टेकू घ्यावे लागले


जयंत पाटील म्हणाले, 400 पार जाणारा वारु 240 वर अडकला. त्यामुळे दोन टेकू घ्यावे लागले. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी आयुष्यात 5 वर्ष एकासोबत काढले नाहीत. त्यामुळे हे सरकार कधी खाली येईल, याचा नेम नाही. एककल्ली पडेल तसं वागणार सरकार आता मर्यादेत वागायला लागलं आहे. वित्त आयोगच्या फॉर्म्युल्याप्रमाणे पैशाचं वाटप करावं. पण पाठिंबा दिलाय म्हणून बिहारला आणि आंध्रप्रदेशला मर्यादा सोडून प्रचंड निधी देण्याचं आश्वासन अर्थसंकल्पात दिलं. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्‍यांना साडेसात हजार कोटी मिळाले हे सांगाव लागलं, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. 


आपण ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना विजयी केलं, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करेन. महायुतीचे काळे कारनामे लोकांच्या समोर मांडण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य महाराष्ट्रात आम्ही आणू, असा विश्वास जनतेला देण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरु केली, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं. इडीची छडी आहे तोपर्यत गेलेले परत येणार नाही. लाडका जावई नावाची नवी योजना येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे.  खुर्च्या टिकवण्यासाठी रात्रभरात दहा वेळा दिल्लीला जाता मात्र कांदा उत्पादकांची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नाही आता कांदा संपल्यावर माफी मागताय अशी खरमरी टीका करत जयंत पाटलांनी अजित पवारांना घेरलं.


इतर महत्वाच्या बातम्या 


तुम्ही एकनाथ खडसेंच्या कन्या, महिलांच्या भावना काय कळणार? रोहिणी खडसेंच्या टीकेवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर