NCP on Rohini Khadse : तुमच्या 1500 रुपयांमध्ये सुख मिळणार आहे का? या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. सरकारला वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे. पण त्यांना महिला अद्याप समजल्याच नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) केली. आता रोहिणी खडसेंच्या टीकेला राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar Group) प्रत्युत्तर दिले आहे.  


महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करू नका


अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडे यांनी म्हटलंय की, रोहिणी खडसे महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करू नका. रोहिणी खडसे तुम्ही म्हणता अजितदादांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय दिलं. तर अजितदादांनी लाखो शेतकऱ्यांना मोफत विजेची संधी दिली. सौर वीजपंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोलाची मदत केली. एवढेच नाही तर राज्यातील दहा लाख तरुणांना रोजगाराच्या प्रशिक्षणासह स्टायपेंडची सुविधा दिली, असा प्रत्युत्तर आभा पांडे यांनी दिले आहे. रोहिणी खडसे तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी महाराष्ट्राची जनता तुमच्या या प्रयत्नांना बळी पडणार नाही, असेही पांडे म्हणाल्या आहेत. 


तुम्हाला महिलांच्या भावना काय कळणार? 


तर लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी टीकास्त्र डागले आहे. 1500 रुपयांत काय होत? असे रोहिणी खडसे म्हणाल्या. त्यावर वैशाली नागवडे यांनी तुम्हाला काय कळणार महिलांच्या भावना. तुम्ही तर एकनाथ खडसे यांच्या कन्या आहात. राजकीय आशेनं तुम्ही बोलू लागल्या आहात. महिलांच्या लाभपेक्षा वैयक्तिक लाभाचा विचार करीत आहात.  सरकारवर टीका केल्याशिवाय तुमची आमदारकी कशी फिक्स होणार? असा सवाल वैशाली नागवडे यांनी रोहिणी खडसेंना विचारला आहे. 


नेमकं काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे? 


लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन् पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे. तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. यांना वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे.पण त्यांना महिला अद्याप समजल्याच नाहीत, अशी टीका रोहिणी खडसेंनी केली होती. 


आणखी वाचा


...म्हणून या सरकारला लाडकी बहीण आठवली; शरद पवार गटाचा 'गुलाबी'मय झालेल्या अजितदादांना खोचक शब्दात टोला