मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसाठी दोघांनीही दंड थोपटलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीनेही आता राज्यभर सभा बैठका संवाद यात्रा सुरू करणार आहे. महाविकास आघाडी 16 ऑगस्ट ला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती 20 ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकडे महाराष्ट्रसह संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी युतीची धडपड सुरू आहे. तर सत्ताधारी युतीला सत्तेवरून खेचण्यासाठी महाविकास आघाडी एकही संधी सोडत नाही.जाणून घेऊया सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी रणनीती काय आहे?
महाविकास आघाडीची नेमकी काय रणनिती आहे?
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईमध्ये 16 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच रणशिंग याच सभेतून महाविकास आघाडी फुकंणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्टला काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीत सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून आज पासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असून प्रभारी रमेश चन्नीथला हेही उपस्थित असणार आहेत. मराठवाड्यातील जागा वाटपांच्या चाचणीसह प्रचारांच्या छोट्या-मोठ्या सभा पार पडणार आहेत.
20 ऑगस्टपासून राज्यभरामध्ये संवाद दौरा
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्लामध्ये मेळावा घेणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने 16 ऑगस्ट पासून प्रचार सभेचा नारळ फोडणार आहे आणि थेट वीस तारखेला प्रचारासाठी राहुल गांधी आणि मलिकार्जुन खर्गे मुंबईत येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने चांगलीच कंबर असलेले आहे. याला प्रतिउत्तर देण्यासाठी महायुती सुद्धा 20 ऑगस्टपासून राज्यभरामध्ये संवाद दौरा करत आहे....
काय आहे महायुतीची रणनीती?
प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी रात्री उशिरा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 20 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुती संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. महायुतीचे 288 मतदार संघामध्ये ही संवाद यात्रा होणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरुवात केलेल्या संवाद यात्रेची सांगता मुंबईमध्ये होणार आहे.
एका दिवसाला दोन किंवा तीन मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा होईल. या संवाद यात्रेचा दौरा कमीत कमी सात दिवस आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा असणार आहे. राज्याच्या सातही विभागामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचारात गाजावाजा
महायुतीच्या प्रचारामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा असणार आहे आणि याच मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या पहिला हप्ता 17 ऑगस्टला दिला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत कार्यक्रम घेतला जाईल आणि त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री ही हा कार्यक्रम घेणार आहेत. त्यामुळे ख-या अर्थाने महायुतीच्या प्रचाराला सुरुवात या ठिकाणाहून होणार आहे.
कोण बाजी मारणार?
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या प्रचाराच्या रणनीती ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळतायेत. मात्र प्रश्न उरलाय तो जागा वाटपांचा आणि प्रचारासोबतच जागा वाटपाला सुद्धा युती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरुवात झालेली आहे. जागा वाटप करताना अनेक जागांवर तिढा आहे. कारण युती आणि आघाडीत नवीन भिडू पहिल्यांदा सहभागी झालेले आहेत. त्यामुळे जागावाटप करताना दोघांनाही डोकेदुखी तर असणारच आहे मात्र रुसवे फुगवे ही यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारणार आणि कोण आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.
हे ही वाचा :