Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर इथे रविवारी (25 सप्टेंबर) झालेल्या भाजपच्या (BJP) कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. आपल्या अनोख्या स्टाईल तसेच विनोदी शैलीतून एक एक मुद्दा मांडत रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर टीकाही केली. तर दुसरीकडे राजकारणातील आतापर्यंतच्या अनुभवाचे, कार्यकर्त्यांचे तसेच इतर गमतीदार किस्सेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्यांचे भाषण ऐकताना कार्यक्रमाला उपस्थित सर्व जण हसून हसून लोटपोट झाल्याचे पाहायला मिळाले.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आज काँग्रेसचा नेता कोण आहे तर पप्पू... असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. "20 वर्षांपासून सोबत आहे, मात्र एकदाही बोलले नाहीत. कधी कोणता विषय सभागृहात मांडला नाही. मागे बसत होते तर सोनिया गांधी यांनी त्यांना समोर आणून बसवले. समोर येऊन झोपायला लागले तर पुन्हा त्यांना मागे बसवले, असे म्हणत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टोलबाजी केली.
काँग्रेसमध्ये सक्षम नेता नाही, त्यांना आपण आता पुन्हा सत्ता प्रस्थापित करु अशी ताकदच त्यांच्यात नसल्याचेही रावसाहेब दानवे म्हणाले. हीच परस्थिती काही दिवासांपूर्वी भाजपाची होती. पण भाजप एक नंबरचा पक्ष आहे, तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष आहे. त्यांचे 50 खासदार आहेत, मात्र तरीही पक्षाला उभारी देणारा कोणी नेता नाही, असं दानवे यांनी म्हटलं.
पाचोरा ते जामनेर पीजे रेल्वे विस्तारीकरणासाठी 955 कोटी रुपये मंजूर : दानवे
पाचोरा ते जामनेर (पीजे) ब्रॉडगेज व बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने 955 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे. तसेच जालना ते जळगाव या 174 किमीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर मंजूर झाला आहे, अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी जामनेर इथे केली. जालना-जळगाव नवीन मार्गामुळे खान्देश हा दक्षिण भारताशी जोडला जाईल, असंही दानवे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raosaheb Danve On Rahul Gandhi : रावसाहेब दानवे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका : ABP Majha