Maharashtra Politics : गेले काही दिवस सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही फॉक्सकॉनवरून (Foxconn) जोरदार रणकंदन सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी पहिल्यांदाच लोकशाही आघाडी सरकारच्या कामाचे वास्तव समोर मांडले. राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने गुजरात पेक्षा 11 हजार कोटीच्या जादा सवलती फॉक्सकॉनला दिल्या होत्या. यासाठी लागणारी जागाही नक्की झाली असताना केवळ केंद्राने हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर पॉलिसी बदलल्याने फॉक्सकॉन गुजरातला गेला आणि आता तिथे जागा शोधण्यापासून कमला सुरुवात केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
 
फॉक्सकॉन संदर्भात पहिल्यांदाच आघाडी सरकारची बाजू रोहित पवारांनी आणली समोर 
महाराष्ट्रात फॉक्सकॉन उभा राहणार हे नक्की होत असताना केंद्र सरकार आणि फॉक्सकॉनचे मालक यांची भेट झाली . यानंतर सेमीकंडक्टर उद्योगाला जी १२ हजार कोटींची सवलत होती ती अट केंद्राने काढून टाकल्याने आता ही कंपनी जेवढे कोटी नफा मिळवेल तेवढी तिला सवलत असणार आहे . केंद्राने हि सवलतीची मर्यादा काढून टाकल्यानेच फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचे रोहित पवार यांनी सांगितले . फॉक्सकॉन वरून भाजप नेते लंगडे खुलासे करीत पूर्वीच्या ठाकरे सरकारवर आरोप करीत असताना आमदार रोहित पवार यांनी हा प्रकल्प नेण्यामागे केंद्र सरकारचा कसा हात होता हे समोर आणले आहे.
 
शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले 


राज्यात सध्या एका एका मंत्र्याकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचे पालकत्व आल्याबाबतही रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. मंत्रिपदासाठी इकंचुकांची संख्या जास्त असल्याने नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबई महापालिकेच्या निवडणूक होईपर्यंत लांबवण्यावर हे सरकार विचार करीत आहे. गेले 3 महिने पालकमंत्री नसल्याने राज्याचा विकास रखडला होता. त्यातच आता पुढील दोन महिन्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या यांच्या निवडणूक होणार असल्याने त्याची आचारसंहिता लागू होईल . त्यामुळे आता एका एका मंत्र्याला अशी जादा जिल्ह्याची मंत्रीपदे देऊन ऍडजेस्टमेंट करण्याचे काम शिंदे फडणवीस सरकार करीत असल्याने हे केवळ ऍडजेस्टमेंट सरकार असल्याचा टोला लगावला.
 
अशी वृत्ती आणि असा विचार या देशात चालणार नाही 
भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणे हे निषेधार्ह असून प्रत्येक भारतीयाने याचा निषेध केला पाहिजे, अशी भूमिका घेताना ज्यांनी घोषणा दिल्या त्यांना पकडले पाहिजे असे पवार यांनी सांगितले. अशी वृत्ती आणि असा विचार या देशात चालणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. असे सांगताना कारवाई करताना मात्र याचे भांडवल करून इतरांकडे चुकीच्या नजरेने पाहणे चुकीचे ठरेल असा टोलाही शिंदे सरकारला लगावला.