ठाणे : राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी उद्या 13 मे रोजी मतदान होत असून 11 मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे, 5 व्या टप्प्यात 20 मे रोजी होणाऱ्या मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच,आज रविवार असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गजांच्या सभा मुंबई, ठाणे परिसरात होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. तर, महाविकास आघाडीचे भिंवडी (Bhiwandi) मतदारसंघातील उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासाठी शरद पवार यांची सभा झाली. यावेळी, आपल्या भाषणातून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) लक्ष्य केलं. 


या तालुक्यात मी अनेक वेळा आलोय. जिल्ह्याचे दोन भाग झाले असले तरी प्रश्न तसेच आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षात देशाचे राजकारण बदललं असून देशात जिथे भाजपची सत्ता आहे तिथे परिस्थिती वाईट आहे. मोदी देशाचे पंतप्रधान मात्र ते फक्त भाजपसाठीच काम करतात. निवडणूक येतात तेव्हा प्रधानमंत्र्यांनी काय कामे केली हे सांगणे गरजेचे असते. मात्र, ते केवळ टीका करण्याचं काम करत आहे. पंडित जवाहरलाल नेहरु हे निवडणुकांवेळी स्वातंत्र्यासाठी काय केले व काय करणार हे सांगायचे. इंदिरा गांधी, नरसिंह राव या सर्वांची कामाची पद्धत आम्ही जवळून पहिली. मात्र, एकच प्रधानमंत्री असे पाहिले की दहा वर्षात देशाच्या हितासाठी व विकासासाठी काय केले, हे सांगण्याऐवजी टीका करताना दिसून येतात. देश विकासासाठी कोणतेही धोरण मोदींकडे नाही, लोकशाही धोरणांवर घाला घालण्याचे काम मोदी व भाजप सरकार करत आहे. राज्यात मुख्यमंत्री देखील टीका करण्याचे काम करत आहेत,असे म्हणत नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही शरद पवारांनी निशाणा साधला. 


गळ्यातील मंगळसुत्र काढण्याचं काम पंतप्रधान करतात


संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात करण्याचे काम भाजप कडून केले जात आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनं काढण्याचे काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी आहे, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्या सभेतील भाषणाचा संदर्भ देत पलटवार केला. तसेच, बाळ्या मामा यांची निवड आम्ही सर्वांनी केली, बाळ्यामामा सर्वांना हिंमत देणारा नेता तुमच्यासमोर आहे. त्यामुळे, त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणा, असे आवाहन शरद पवार यांनी भिवंडीतील सभेत केले. 


असत्यमेव जयते हे ब्रीद भाजपने पुढे नेले - राऊत


सर्वांचे लाडके,सर्व पक्षांचे लाडके असा मामांचा उल्लेख संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीलच केला. 
या वेळेला या मतदारसंघात 100 टक्के बदल होतोय, कमळ फुलणार नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्रर फडणवीस या तिघांनाही निरोप देण्याची वेळ आली आहे. मोदी हटाव देश बचाव असा संदेश सर्व जनता देत आहे. सत्यमेव जयते, त्यापेक्षा असत्यमेव जयते हे ब्रीद भाजपने पुढे नेले आहे. भाजपने दहा वर्षात आदिवासी समाजासाठी काय केले याचे उत्तर ते देणार नाहीत. पाटलांना लोक गोडाऊन माफीया म्हणतात ते का म्हणतात, मला माहित नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.  


2014 चे जुने दिवस परत द्या


शेतकरी आत्महत्या करतात त्यावर मोदी बोलत नाही, महाराष्ट्रात बेरोजगारीवर ते बोलत नाहीत,आदिवासी समुदायाला जमिनींचा हक्क नाकारला, त्यावर बोलत नाहीत.  2014 साली महागाई किती व आता किती याच विचार करा. मोदींचे अच्छे दिन नको, 2014 च्या अगोदर चे दिन आम्हाला परत द्या, असे म्हणत संजय  राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.