Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. नाशिक ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळे (Tushar Shewale) यांनी आज धुळ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. 


धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून तुषार शेवाळे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र  उमेदवारी न मिळाल्यामुळे शेवाळे नाराज होते. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या तुषार शेवाळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. तुषार शेवाळे यांच्यासोबत मालेगाव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 


धुळ्यातून उमेदवारी न मिळाल्याने तुषार शेवाळे नाराज 


तुषार शेवाळे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते धुळे व नाशिक जिल्ह्यात ते चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले होते. काँग्रेसतर्फे यंदा धुळे लोकसभेसाठी डॉ. शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे प्रबळ दावेदार असतानाही त्यांचा पत्ता कट करत नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांना धुळ्यातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शेवाळे नाराज झाल्याचे दिसून आले होते. 


शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध 


शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. तुषार शेवाळे आणि शाम सनेर यांनी आयात उमेदवार चालणार नाही, अशी भूमिका घेत आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. यानंतर शोभा बच्छाव या मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीत डॉ. शेवाळे व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी घ्यायला आल्या असताना त्यांना जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यामुळे शोभा बच्छाव यांना माघारी फिरण्याची वेळ आली होती. 


तुषार शेवाळेंची नुकतीच काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी झाली होती नियुक्ती


यानंतर श्याम सनेर यांची नाराजी दूर करण्यास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना यश आले होते. तर डॉ. शेवाळे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीवर डॉ. शेवाळे यांनी कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पक्षासाठी निष्ठेने काम करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून डॉ. शेवाळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.


चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश


आज धुळे येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बावनकुळे यांनी डॉ. शेवाळे व तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत सत्कार केला. यावेळी मंत्री जयकुमार रावल, धुळे लोकसभेचे उमदेवार डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. 


काँग्रेसकडून तुषार शेवाळेंचे निलंबन


दरम्यान, धुळ्यात आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचे कालच काँग्रेस पक्षातून 6 वर्षांकरिता निलंबन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका तुषार शेवाळे यांच्यावर ठेवण्यात आला. पक्षाने कारवाई करताच दुसऱ्याच दिवशी तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 


आणखी वाचा 


Dhule Lok Sabha : सुभाष भामरेंपेक्षा शोभा बच्छाव अधिक श्रीमंत, धुळ्यातील उमेदवारांकडे किती कोटींची संपत्ती?