अहमदनगर : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरूच असून चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या (Voting) प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर रात्रीस खेळ चाले, असाच प्रचार होताना दिसत आहे. पक्षाचे नेते व पदाधिकारी घरोघरी भेटी देऊन, कार्यकर्ते व मतदारांना बुथ केंद्रावर येऊन मतदान करण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र, मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर शहरातील (Ahmednagar) जुना वाद उफाळून आल्याने दोन गटांत राडा झाला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याचं पाहायला मिळालं. जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फोडण्यात आले असून एका स्कार्पिओ वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीत स्कॉर्पिओ कारच्या पाठिमागील व समोरील काचा फोडण्यात आल्या आहेत. अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्यातच, मंगलगेट परिसरातील राड्याची माहिती मिळताच, याठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
लंके विरुद्ध विखे पाटील
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 13 मे रोजी मतदान होत असून महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत आहे. खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना येथील मतदारसंघात आहे. त्यामुळे, निलेश लंकेंनी खासदार होण्याचा निश्चिय केला आहे, तर अजित पवारांनी पारनेरमध्ये येऊन, तू कसा खासदार होतो तेच बघतो म्हणत सुजय विखेंना निवडून देण्याचं आवाहन नगरकरांना केलं आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात चांगलीच चूरस निर्माण झाली आहे.
हेही वाचा