Defence Minister Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) येथे 28 व्या संयुक्त नागरी-लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, ''संयुक्त नागरी लष्करी कार्यक्रम राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात फायदेशीर ठरेल. नागरी सेवक आणि सशस्त्र दलातील अधिकारी यांच्यातील समन्वय आणि सहकार्याची समज विकसित करण्यातही हे उपयुक्त ठरेल.''


या कार्यक्रमातील सहभागी नागरी सेवा, सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचे व्यवस्थापन, बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा वातावरण तसेच जागतिकीकरणाच्या प्रभावाशी संबंधित आव्हाने सहभागींना परिचित करणे हा त्याचा उद्देश आहे. सहभागींना या विषयावर संवाद साधण्याची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करणे, तसेच नागरी-लष्करी समन्वयाच्या अत्यावश्यकतेची जाणीव करून देणे हे देखील याचे उद्दिष्ट आहे.


भारत हा शांतता प्रिय देश 

या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, शांततेच्या काळातही अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू असते. युद्ध हे कोणत्याही देशासाठी जितके प्राणघातक असते तितकेच ते त्याच्या शत्रूंसाठी ही असते. त्यामुळे गेल्या काही दशकांत युद्धे टाळली गेली आहेत. आता युद्धाची जागा पडद्याआडून अप्रत्यक्ष संघर्षांनी घेतली आहे. सध्या तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यवसाय व्यवस्था, वित्त व्यवस्था इत्यादी शस्त्रास्त्रे बनवली जात आहेत. या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण वाईट नजरे ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तरही देऊ असे संरक्षण मंत्री म्हणाले.


मेक इंडियावर काय म्हणाले संरक्षण मंत्री?


ते म्हणाले की, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी उचललेल्या पावलांचे परिणाम मिळू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड व्हिजनच्या अनुषंगाने भारत आता केवळ आपल्या सशस्त्र दलांसाठी उपकरणे तयार करत नाही, तर मित्र देशांच्या गरजाही पूर्ण करत आहे.