बीड: बीडच्या सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलन जरांगे पाटील हे एकाच मंचावर आले होते. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे थेट रुग्णालयातून सप्ताहाला भेट देण्यासाठी आले असल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांच्या तब्येतीची विचारणा देखील केली. मात्र, यावेळी मंचावर आसन व्यवस्थेवरून मराठा आंदोलक आणि स्थानिक आयोजक यांच्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा पंकजा मुंडे यांनी तात्काळ माईक हातात घेतला आणि सर्वांना शांत राहण्यास सांगितले.


सगेसोयऱ्याची आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास 288 विधानसभेच्या जागा लढवणार: मनोज जरांगे पाटील


या कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकारने तात्काळ सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास 288 विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः देखील उभा राहीन, असेदेखील ते म्हणाले. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही.


लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार असून याची तयारी एक महिन्यापासून सुरू केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींना देखील स्वतःचा प्रचार सोडून आता इतर नेत्यांचा देखील प्रचार करावा लागत आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.


दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीडमधून लोकसभेचा अर्ज भरला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, त्यांच्यामागे कोणी आहे का? कारण ते मला भेटून बीडमध्ये गेले आणि अचानक अर्ज कसा भरला याचा शोध घ्यावा लागेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.


मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय: जरांगे पाटील


मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना स्वत:चा प्रचार सोडून इतरांचा प्रचार करत फिरावे लागत आहे. मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. पण मराठा समाज एकटवल्याची भीती असल्याने मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावे लागत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


आणखी वाचा


मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं