मुंबई: काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि भाजपकडून प्रख्यात वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे कालपर्यंत फारशा चर्चेत नसलेला उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ अचानक लाईमलाईटमध्ये आला आहे. या मतदारसंघात दोन तगड्या उमेदवारांची घोषणा झाल्याने उत्तर-मध्य मुंबईत (North Central Mumbai Lok Sabha) हायव्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, आता या दोघांशिवाय आणखी एका उमेदवाराच्या एन्ट्रीने उत्तर-मध्य मुंबईची लढाई आणखी इंटरेस्टिंग होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. संजय पांडे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त होते. तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आता संजय पांडे उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास याठिकाणी मोठी चुरस निर्माण होऊ शकते.
संजय पांडे यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय अद्याप अंतिम नाही. मात्र, त्यांनी म्हटले की, मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपल्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांच्या आग्रहावर मी विचार करत आहे. याबद्दल कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे संजय पांडे यांनी सांगितले. मुंबईत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संजय पांडे काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
मोदी-शाहांमुळे शत्रुराष्ट्राची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही: उज्ज्वल निकम
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच उज्ज्वल निकम यांनी मुंबईत देवदर्शनाचा धडाका लावला आहे. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी मुंबादेवी, चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या काही वर्षात ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल झाले आहे. शत्रूराष्ट्राची आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत नाही. त्यामुळेच मी भाजपमध्ये गेलो. मी वकील असल्याने चेहरा बघून माणूस ओळखतो, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
भारतीय संविधान बदलले जाणार, हा गोबेल्स नितीचा प्रचार सध्या सुरु आहे. पण भारतीय घटना कुठेही बदलली जाऊ शकत नाही. हा प्रचार पूर्णपणे खोटा आहे. संसदेत ज्यावेळी मला बोलायची संधी मिळेल तेव्हा मी घटनेच्या आधारावरच बोलेन, असे निकम यांनी सांगितले. मी बाहेरचा नाही,जळगाव ही माझी जन्मभूमी असली तरी माझी कर्मभूमी मुंबई असल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
आणखी वाचा