सिंधुदुर्ग : नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंबंधित माझ्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका फार महत्वाची आहे. मुख्यमंत्र्यांनी याअगोदर सांगितले आहे की माझा विकासाला विरोध नाही. परंतु, स्थानिक जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे. स्थानिकांचा विरोध नसेल तर चांगले उद्योग आले पाहिजेत अशा मताचे मुख्यमंत्री आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी दिली आहे.


नाणार ग्रीन रिफायनरी आल्यास कोकणातील आंब्याच्या बागांवर परिणाम होणार का? हे पाहणं महत्वाचे आहे. आंब्याच्या बागा हे कोकणंच वैभव आहे. कोकणात येणाऱ्या ग्रीन रिफायनरीमुळे यावर परिणाम होणार की नाही याबाबत आवश्यक ते संशोधन होऊन ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध नाही असं मुख्यमंत्र्यांना सांगितले तरच मुख्यमंत्री यातून मार्ग काढू शकतात. यासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे तसं झाल्यास कोकणात अनेक प्रकल्प येऊ शकतील, असे शिवसेना नेते दिपक केसरकर म्हणाले.


नाणारमध्ये ग्रीन रिफायनरी आली तेव्हापासून जो विरोध होत आहे, तो विरोध शिवसेनेचा विरोध नाही. स्थानिकांचं जे मत असतं त्या मतासोबत शिवसेना नेहमीच राहते. हा प्रकल्प जर झाला पाहिजे असं वाटत असल्यास या प्रकल्पाचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही, बागायतीवर कोणता परिणाम या प्रकल्पामुळे होणार नाही हे सिद्ध व्हायला लागेल. जर कुणाला वाटतं असेल हा प्रकल्प झाला पाहिजे तर त्यांनी स्थानिकांना समजावलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर स्पष्ट केलं की माझा विकासाला विरोध नाही. ग्रीन रिफायनरी हा पेट्रोलियमचा प्रकल्प असल्यामुळे स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे यावर संशोधनाच्या मार्गातून कोकणातील आंबा, काजू वर परिणाम होणार की नाही हे समजू शकतं. कोकणातील रोजगाराचा प्रश्न हा प्रकल्प आल्यास निश्चित सुटू शकतो. मात्र, प्रकल्प येत असताना कोकणातील कोकणीपण टिकलं पाहिजे, असंही केसरकर शेवटी म्हणाले.