मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्रातील पहिल्या 4 टप्प्यातील निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर फिरुन जाहीर सभांमधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला. आता, मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात निवडणुका होत आहेत. त्यामुळे, ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील 6 जागांसाठीची रणनिती सुरू आहे. डोंबिवलीत आज उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर हल्लाबोला केला. तसेच, 4 जून नंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत, असे भाकीतही उद्धव ठाकरेंनी केले. यावेळी, देवेंद्र फडणवीसांसंदर्भात(Devendra Fadanvis) विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं. 


उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतून पुन्हा एकदा मोदींवर थेट निशाणा साधला. घाटकोपर दुर्घटना, मोदींचा रोड शो, जुमलेबाजी, शिवसेनेतील फूट, कांदा उत्पादक शेतकरी, महाविकास आघाडी, मोदींचा पराभव, 70 हजार कोटींचा घोटाळा, 400 पारचा नारा, अशा सर्वच मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करु असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, नेमकं ते काय?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, देवेंद्रच्या वरती मी काही बोलतच नाही, कारण तो माणून बोलायच्या पातळीचाच नाही. तो एक कठपुतळी आहे, मी कठपुतळींचे खेळ बघतो पण बोलत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हलक्यात घेतलंं. 



 


उद्धव ठाकरेंच्या EXclusive मुलाखतीमधील मुद्दे


महाराष्ट्र हा स्वाभिमानी, गद्दारांना आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्लीतील शाह यांनाही माफ करत नाही. राज्यभर फिरत असलेल्या सभांमधून जनतेत आक्रोश आणि सूडाची भावना असल्याचे दिसत आहे. गेली दहा वर्षे भाजपच्या जुमल्याला जनता कंटाळली आहे. घाटकोरपमध्ये दोन दिवसांपूर्वी दुर्घटनेत 16 लोक मृत्युमुखी पडले, त्यानंतरही पंतप्रधानांनी वाजत गाजत रोड शो केला. कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली, त्यामुळे घरी लहान मुले वाट बघत असलेल्या पालकांना घरी जाण्यास उशीर झाला, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या रोड शो वरुन टीका केली. 


मोदींना ताण पडलाय, मानसिक परिणाम झालाय


मोदींच्या सभेपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडवून ठेवलं, आमच्या शिवसैनिकांना अडवून ठेवलं. मोदींनी महाराष्ट्रात 25 सभा घेतल्या, जमल्या तर आणखी सभा घ्याव्यात, असेही ठाकरेंनी म्हटले. मोदींकडून नकली शिवसेना, नकली संतान असा उल्लेख होत असल्याबाबत प्रश्न विचारला असता, मोदी सुद्धा माणूस आहेत, गेली 10 वर्षे ते झोपले नाहीत असं म्हणतात. त्यामुळेच त्यांच्यावर मानसिक परिणाम झालाय. तिसऱ्यांदा त्यांना बोहल्यावर चढवतात, मग माणूस तर थकणार ना. त्यांच्या मेंदूला ताण पडला असल्याने 2014 आणि 2019 साली त्यांच्या पंतप्रधानपदासाठी मी सही केली होती हे लक्षात राहत नाही. त्यांना कितीही सांगा, त्यांना आता काही फरक पडणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला.


महाराष्ट्रात एवढ्या सभा का?


भाजपसोबत असलेले इतर नेते नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे हिंदुत्ववादी आहेत का? खोटं कोण बोलतंय हे जगाने पाहिलंय 2019 साली  म्हटलेलं की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, त्यांची ही जुमलेबाजी जनतेला माहिती झालीय, असे ठाकरेंनी म्हटले. तसेच, बंद दाराआड झालेल्या चर्चेवर बोलताना, मी आई तुळजाभवानीची शपथ घेतली होती, पण जय भवानी हेच त्यांना मान्य नाही. नकली शिवसेना म्हणत असाल तर महाराष्ट्रात एवढ्या सभा का घेतल्या, महाराष्ट्राने त्यांना गुढघे टेकायला लावले आहेत. एकदा म्हणतात की उद्धव ठाकरेंना मदत करतो, दुसऱ्या दिवशी म्हणतात की नकली संतान, असा संभ्रमही असल्याचं त्यांनी म्हटलं.  


पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा


देश आता त्यांच्या हातात द्यायचं कारण नाही. मोदींचे कॉन्ट्रॅक्ट संपलंय, हे मी बोलत नाही, जे दिसतंय ते सांगतोय. 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, आदर्श, इकबाल मिर्ची आणि विमान घोटाळा आरोप कोण केला होता. मोदींच्या मेंदूला क्षीण आलेला आहे. 4 जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. मोदींना आता 75 वर्षे होणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा चेहरा नाही. 400 पार होणार असाल तर पक्ष का फोडलाय. मोदी झोळी घेऊन जातील, तुमच्या पारड्यात काय पडणार, असा सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारला. गेल्या 10 वर्षात तर त्यांनी नेतृत्व तयार केलं नाही, मोदींना आरामाची गरज आहे. तर, मिंधे-शिंदे हे भाजपमध्ये विलीन होतील. पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील उद्याची शेवटची सभा असेल, असेही ठाकरेंनी म्हटलं.