बीड : राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. राज्यातील 48 जागांपैकी भाजप महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला. त्यामध्ये, मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महायुतीला पराभवाचा फटका बसला असून बीडमध्ये पंकजा मुंडेंचाही (Pankaja munde) 6 हजार मतांनी पराभव झाला आहे. त्यानंतर, बीडच्या (Beed) पराभवाची अनेक कारणे शोधली जात असून मराठा आणि वंजारी असा जातीय संघर्ष झाल्याची चर्चा आहे. तर, महायुतीतील घटक पक्षांनीही पंकजा मुंडेंविरुद्ध काम केल्याचाही आरोप करण्यात आला होता. आता, शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने ते मान्य केल्याचं उघडकीस पडलं आहे. 


बीड लोकसभा निवडणूक काळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, कुंडलिक खांडेंचा फोन बंद असून हा माझा आवाज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी


बीडमध्ये बजरंग सोनवणेंकडून पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. मुंडेंचा तो पराभव मुंडे समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं. कारण, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी आत्महत्याच्या घटना घडल्या. तर, पंकजा मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बंद पुकारण्यात आला होता. पाथर्डी, शिरुर, परळीसह विविध ठिकाणी बंद पुकारत पंकजा मुंडेंविरुद्धच्या पोस्टच्या अनुषंगाने निषेधही व्यक्त करण्यात आला आहे.


हेही वाचा


विधीमंडळातील भेटीची A टू Z कहाणी! आधी चंद्रकांत पाटील, मग देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची भेट 


Video : राम मंदिराला गळती, पेपरला गळती; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंचा घणाघात